मंत्र्यांवर कारवाई कधी? जैन मंदिर पाडल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुंबईत पालिकेने एक जैन मंदिर पाडले आहे. यावरून अधिकाऱ्याची बदली झाली, पण मंत्र्यावर कारवाई कधी होणार असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे, नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरेयांनी विचारला आहे. तसेच मंगलप्रभात लोढा हे मुंबईचे सहपालकमंत्री आहेत ते नेमक्या कोणत्या गोष्टीचा निषेध करत आहेत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, सह-पालकमंत्री निव्वळ नाटक करत आहेत! मुख्यमंत्री – त्यांच्याच पक्षाचे. मुंबई महानगरपालिका मुख्यमंत्री कार्यालयातून चालवली जाते. ते स्वतः – त्या जिल्ह्याचे सह-पालकमंत्री. कारवाई कोणी केली? मुंबई महानगरपालिकेने, जी मुख्यमंत्री कार्यालयातून चालते. कुठे? ज्या जिल्ह्याचे ते सह-पालकमंत्री आहेत तिथल्या परिसरात. मग ते नेमका कोणत्या गोष्टीचा निषेध करत आहेत? त्यांना पूर्ण हक्क होता. मुंबई महानगरपालिकेला सांगायचा की केस ऐकली जाईपर्यंत कारवाई करू नये. तसं त्यांनी का केलं नाही? ते जैन समाजाला आणि नागरिकांना खोटं सांगत आहेत! प्रश्न आहे — नेहमीप्रमाणे अधिकारी बदलला गेला, पण मत्र्यांवर कारवाई कधी? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.