
80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या प्रमाणे भोकरदन तालुक्यातील पारध येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांनी गावासाठी काही पण या प्रमाणे त्यांचे बंधू उपसरपंच शेखर श्रीवास्तव यांना सांगून स्वतःच्या विहीरीतून पाणी देऊन पारध गावाची तहान भागवली. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावात 30 जून 2025 पर्यंत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उद्भवावर प्रतिकुल परिणाम करणाऱ्या विहिरीमधील पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावामध्ये पारघचाही समावेश आहे.गावातील पाणीटंचाई लक्षात घेता उपसरपंच शेखर श्रीवास्तव यांनी ‘गावासाठी काही पण’ या उक्तीला प्रत्यक्षात उतरवले. त्यांनी स्वतःच्या विहिरीतून थेट सरकारी पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत पाणी सोडले, ज्यामुळे गावकऱ्यांना तिसऱ्या दिवशी वेळेत पाणी मिळाले.
आज दिवसभर गावात सिंगल फेज विद्युत पुरवठा होता. त्यामुळे सरकारी पाणीपुरवठा योजनेवरील विद्युत पंप चालू शकत नव्हता. यामुळे गावकऱ्यांमध्ये पाण्याची चिंता वाढली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपसरपंच शेखर श्रीवास्तव यांनी तातडीने कार्यवाही केली. श्रीवास्तव यांनी तत्काळ विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलून गावकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात आणून दिली आणि काही काळासाठी श्री फेज विद्युत पुरवठा सुरू करण्याची विनंती केली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्पुरता थ्री फेज पुरवठा सुरू केला.
थ्री फेज पुरवठा सुरू होताच, शेखर श्रीवास्तव यांनी खासगी विहिरीतील पाणी सरकारी योजनेच्या विहिरीत सोडण्यास सुरुवात केली. त्यांच्या या तत्परतेमुळे गावकऱ्यांना वेळेत पाणी मिळू शकले. या कार्याबद्दल बोलताना काही गावकऱ्यांनी सांगितले की, ‘आज आम्हाला पाण्याची खूप गरज होती. सिंगल फेजमुळे पंप चालू नव्हता आणि काय करावे हे सुचत नव्हते. अशा स्थितीत उपसरपंच श्रीवास्तव यांनी दाखवलेली तत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी ‘गावासाठी काही पण’ हे बोलून नाही तर कृतीतून दाखवून दिले आहे. उपसरपंच शेखर श्रीवास्तव यांच्या या कार्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. त्यांची ही कृती इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.