
राज्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर तो मराठी मनासाठी सुवर्णक्षण असेल. ठाकरेच नव्हे तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यावं, असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या #महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर #सर्वच कुटुंबांनी #महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत आहे, अशी पोस्ट करत त्यांनी या पोस्टमध्ये राज-उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवार आणि अजित पवारांनाही टॅग केलं आहे. त्यामुळे त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि एकत्र येण्याचे संकेत दिलेत. त्यांच्या या टाळीला उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद दिला. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातली भांडणं किरकोळ आणि क्षुल्लक आहेत. एकत्र येणं हे कठीण नाही, पण प्रश्न इच्छेचा आहे असं राज ठाकरे म्हणाले. महेश मांजरेकर यांच्या यूट्यूबवरील मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. यावर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद देत आपल्याकडून भांडण नव्हतं, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायलाही तयार आहोत असं ते म्हणाले. यावर रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.