
गुणतक्त्यामधील दोन अव्वल संघांमध्ये झालेल्या लढतीत गुजरात टायटन्सने 7 फलंदाज आणि 4 चेंडू राखून बाजी मारत दिल्ली कॅपिटल्सला दुसऱ्या स्थानावर ढकलत पुन्हा एकदा आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज केले. जोस बटलरची नाबाद 97 धावांची खेळी आणि प्रसिध कृष्णाने टिपलेले चार बळी हे गुजरातच्या विजयाचे वैशिष्ट्ये ठरले. राहुल तेवतियाने फलंदाजीला आल्यावर तीन चेंडूंत नाबाद 11 धावा पटकावित गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मात्र, त्याच्यामुळे सामनावीर ठरलेल्या जोस बटलरचे अवघ्या 3 धावांनी हुकलेले शतक क्रिकेटप्रेमींच्या मनाला चटका लावून गेले.
दिल्ली कॅपिटल्सकडून मिळालेले 204 धावांचे लक्ष्य गुजरात टायटन्सने 19.2 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. खरंतर गुजरातची अडखळती सुरुवात झाली होती. कर्णधार शुभमन गिल अवघ्या 7 धावांवर दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. मात्र, दुसरा सलामीवीर साई सुदर्शन व आलेला जोस बटलर यांनी अजिबात दडपण घेतले नाही. 21 चेंडूंत 5 चौकार व एका षटकारासह 36 धावांची खेळी करून सुदर्शन कुलदीपच्या गोलंदाजीवर स्टब्जकरवी झेलबाद झाला.
जोस-रुदरफोर्डची शतकी भागीदारी
गुजरातची 7.3 षटकांत 2 बाद 74 अशी स्थिती होती. त्यानंतर जम बसलेला जोस बटलर व इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला शेरफन रुदरफोर्ड या जोडीने दिल्लीच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. या जोडीने 69 चेंडूंत 119 धावांची भागीदारी करीत बघता बघता गुजरातला विजयाच्या समीप आणले. विजयासाठी 11 धावांची गरज असताना रुदरफोर्ड बाद झाला. 34 चेंडूंत 3 षटकार व एका चौकारासह 43 धावा पटकाविल्यानंतर त्याने मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर स्टार्ककडे झेल दिला.
बटलरची संस्मरणीय खेळी
रुदरफोर्ड बाद झाल्यानंतर राहुल तेवतिया फलंदाजीला आला. गुजरातला विजयासाठी 7 चेंडूंत 11 धावांची गरज होती. मुकेश कुमारच्या अखेरच्या चेंडूवर तेवतियाने एक धाव घेतली. त्यामुळे अखेरच्या षटकात तोच स्ट्राईकला आला. मिचेल स्टार्कच्या या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार व चौकार ठोकून तेवतियाने सामना संपविला. त्यामुळे बटलरचे शतक होता होता राहिले. त्याने 54 चेंडूंत 11 सणसणीत चौकार व 4 टोलेजंग षटकारांसह आपली 97 धावांची संस्मरणीय नाबाद खेळी सजविली. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादव व मुकेश कुमार यांना 1-1 बळी मिळाला..
दिल्ली दोनशे पार
दरम्यान, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 8 बाद 203 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या डावात एकाही फलंदाजाला अर्धशतकी मजल मारता आली नाही. मात्र, बहुतांश फलंदाजांनी संक्षिप्त; पण देखण्या खेळ्या करत आपल्या संघाला दोशनेपार नेले. यात सलामीलाच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या अभिषेक पोरलने 9 चेंडूंत 3 चौकार व एका षटकारासह 18 धावा केल्या. करुण नायरने 18 चेंडूंत 31, लोकेश राहुलने 14 चेंडूंत 28, कर्णधार अक्षर पटेलने 32 चेंडूंत 39, ट्रिस्टन स्टब्जने 21 चेंडूंत 31, तर आशुतोष शमनि 19 चेंडूंत 37 घावा पटकाविल्या. 9 वाईड बॉलसह 12 अवांतर धावांची खुराकही मिळाल्याने दिल्लीला दोनशेचा टप्पा ओलांडता आला. गुजरात टायटन्सकडून प्रसिध कृष्णाने सर्वाधिक 4 फलंदाज बाद करीत दिल्लीच्या आघाडीच्या फळीला हादरे दिले. मोहम्मद सिराज, अर्शद खान, इम्पॅक्ट प्लेअर इशांत शर्मा व साई किशोर यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.