
पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून भ्रष्ट कारभाराने कळस गाठला आहे. कामे न करता बिले काढण्याचा सपाटा लावला आहे. संचालक मंडळाने त्यांच्या दोन वर्षांच्या काळात कामगार सोसायटीजवळील जुन्या पाण्याच्या टाकीच्या जवळील न्यायप्रविष्ट जागेतील कचरा, राडारोडा उचलणे आणि जागा स्वच्छ करण्याच्या नावाखाली सुमारे नऊ ते साडेनऊ लाखांची दोन वेळा बिले काढण्यात आली. एकाच जागेवरील दोनदा साफसफाई करत एकूण सुमारे 19 लाख 78 हजार रुपये खर्च केल्याने बाजारात खळबळ उडाली आहे.
पुणे बाजार समितीवर मे 2023 मध्ये संचालक मंडळ आले. समितीवर संचालक मंडळ आल्यापासून मनमानी कारभाराचा धडाका सुरू आहे. गुलटेकडी मार्केटयार्ड येथील गेट क्रमांक 7 जवळ न्यायप्रविष्ट जागा आहे. या जागेवरील कचरा हटवणे आणि साफसफाईचे काम केल्याचे दाखवून जून महिन्यात 9 लाख 97 हजार रुपयांचे बिल काढले. त्यानंतर संचालक मंडळाच्या कारभाराला दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी पुन्हा एकदा संचालक मंडळाला या जागेवरील साफसफाई करण्याची आठवण झाली. या जागेवरील पुन्हा साफसफाई केल्याचे दाखवून सुमारे 9 लाख 80 हजार रुपयांचे बिल काढले. या ठरावाला बाजारातील एका संचालकाने विरोध केला असून, इतर सर्व संचालकांनी मंजुरी दिली आहे. याबाबत बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर म्हणाले, याबाबत सत्यता पडताळून कारवाई करू.
महापालिकेनेच केली होती साफसफाई राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी येथील कचऱ्याचा प्रश्न समोर आणत पालिका प्रशासनाला धारेवर घरले होते. त्यानंतर पालिकेने येथील कचरा हटविला होता. याचा फायदा घेत बाजार समिती संचालक मंडळाने काम न करताच, येथे साफसफाईचे काम केले दाखवून दहा लाखांचे बिल काढल्याची बोंब झाली होती.
तीन दिवस जेसीबी चालवला अन् बिल दिले दहा लाखांचे !
महिना ते दीड महिन्यापूर्वी पुन्हा नुकतेच डाळिंब यार्ड करण्याच्या नावाखाली पुन्हा नुकतेच सपाटीकरणाचे काम सुरू केले. मात्र, केवळ तीन दिवस जेसीबीने कचरा सपाटीकरण केले. एक हजार रुपये एक तासप्रमाणे रोजचे दहा तास पकडले तरी 30 हजार रुपयांत हा कचरा व राडारोडा सपाट केल्याचे दाखवले. मात्र, संचालक मंडळाने या कामाचे 9 लाख 80 हजार रुपये बिल काढले