संग्राम थोपटे यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, दोन दिवसांत भाजप प्रवेश

राज्यात फोडाफोडीच राजकारण करून सत्तेत आलेल्या कमळाबाईने आणखी एक घराण फोडून काँग्रेसच्या माजी आमदाराला गळाला लावले आहे. पुण्यातील काँग्रेसचे बडे नेते संग्राम थोपटे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

भोर विधानसभा मतदारसंघातून संग्राम थोपटे हे सलग 3 वेळा निवडून आले होते. पण यंदाच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर ते काँग्रेसपासून दूर गेले होते. ही संधी साधून भाजपने मागील काही दिवसांपासून त्यांच्याशी जवळीक वाढवली आहे. भाजप नेतृत्वाशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. थोपटे यांनी रविवारी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली असून यावेळी ते भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.