
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने आक्रमक निर्णय घेत परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर कडक निर्बंध लादले आहेत. अशातच अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनने (एआयएलए) नवीन अहवालातून तेथील परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द होण्याच्या वाढत्या संख्येवरून चिंता व्यक्त केली. अमेरिकेने ज्या विद्यार्थ्यांचे व्हिसा काढून घेतले त्यापैकी 50 टक्के विद्यार्थी हिंदुस्थानातील होते, असा खुलासा एआयएलएच्या अहवालातून झाला आहे.
ट्रम्प सरकारने 327 व्हिसा रद्द करण्याच्या प्रकरणांवर चौकशी करण्यात आली. त्यानुसार हिंदुस्थानचे विद्यार्थी सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले. हिंदुस्थानपाठोपाठ चीनच्या 14 टक्के विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे ज्यांचा व्हिसा रद्द झाला त्यापैकी निम्म्याहून अधिक विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिथे काम करत होते.
n व्हिसा रद्द करण्यामागे नेहमीच एक कारण असते. राजकीय आंदोलनांमध्ये सहभाग घेणाऱया विद्यार्थ्यांवर कारवाई होऊ शकते, त्यांचा व्हिसा रद्द होऊ शकतो, असे प्रशासनाने सांगितले. मात्र, एआयएलएच्या अहवालानुसार, चौकशी केलेल्या 327 विद्यार्थ्यांपैकी फक्त दोन विद्यार्थ्यांचा राजकीय आंदोलनांमध्ये सहभाग होता. दरम्यान, वकील संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 86 टक्के विद्यार्थ्यांनी पोलिसांशी संवाद साधून आपली समस्या मांडली, मात्र यापैकी 33 टक्के प्रकरणे विचारातही घेण्यात आली नाहीत. उर्वरित काही विद्यार्थ्यांवर वेगाने गाडी चालवल्याचे किंवा किरकोळ पार्ंकग नियमांचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल होते.