स्पेस टुरिझम बाजाराला ‘अच्छे दिन’, चला भुर्रर… अंतराळ ट्रिपसाठी 1 हजार बुकिंग

स्पेस टुरिझमचा उद्योग वेगाने वाढत आहे. जगभरातील अनेक कंपन्या आता यासाठी पुढे आल्या आहेत. जेफ बेजोस यांची कंपनी ब्लू ओरिजनने नुकतीच एक सहा महिलांची अंतराळ टूर केली आहे. ही ट्रिप यशस्वी झाल्यानंतर आता जगभरातून अंतराळ ट्रिपवर जाण्यासाठी रांग लागली आहे. आतापर्यंत एकूण 1 हजार लोकांनी अंतराळ टूरसाठी बुकिंग केले आहे. हे सर्व जण टप्प्याटप्याने अंतराळ टूरसाठी जाणार आहेत. 2023 मध्ये जागतिक स्पेस टुरिझमचा बाजार 96,114 कोटी रुपयांचा होता. परंतु, 2032 पर्यंत हा बाजार तब्बल 1.47 लाख कोटी रुपयांचा होईल, असे जाणकारांनी म्हटले आहे. वर्षभरात 400 हून अधिक फ्लाईट्स पृथ्वीवरून थेट अंतराळात उड्डाण करताना दिसतील. म्हणजेच सरासरी दिवसाला एक फ्लाईट्स उड्डाण करताना दिसणार आहे. अंतराळ टूरला जाणाऱया प्रवाशांना आधी प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना अंतराळात पाठवले जाते. त्यामुळे अनेकांनी आतापासूनच तिकीट बुक करून ठेवले आहे. सध्या स्पेस टूरिझम उद्योगासमोर अनेक आव्हाने आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता अजूनही आहे. अंतराळ ट्रिपसाठी सध्या जास्त पैसा लागत आहे. तो कमी करण्याचा प्रयत्न कंपन्यांपुढे आहे.

या कंपन्यांचा पुढाकार

अंतराळ टूरवर जाण्यासाठी जगभरातील अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये जेफ बेजोस यांची कंपनी ब्लू ओरिजनचा समावेश आहे. ब्लू ओरिजनचा उद्देश अंतराळात जाणाऱया प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ बनवणे आहे. रिचर्ड ब्रॅनसन यांच्या व्हर्जिन गॅलेक्टिव कंपनीसुद्धा अंतराळ टूरवर जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. एलॉन मस्क यांची स्पेक्सएक्स कंपनी, एक्सीओम स्पेस कंपनी, बोईंग कंपनी, झिरो ग्रॅव्हिटी कॉर्पोरेशन कंपनी, स्पेस ऍडव्हेंचर कंपनी, स्पेस पर्स्पेक्टिव्ह कंपनी अंतराळ टूरवर जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत.