Nagpur News – नागपूरमध्ये भांडेवाडी डंपिंग ग्राऊंडला भीषण आग, अग्नीशमन दलाचा एक बंबही जळून खाक

नागपुरातील भांडेवाडी डंपिंग ग्राऊंडला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत अग्नीशमन दलाचा एक बंबही जळून खाक झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करीत आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. मात्र आसपासच्या परिसरातील नागरिकांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथन शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास डंपिंग ग्राऊंडला आग लागली. मात्र अग्नीशमन दलाच्या दोन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास पुन्हा आग भडकली आणि पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले.

अग्नीशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. यादरम्यान आग विझवत असताना अग्नीशमन दलाच्या एका बंबाने आग पकडली. आगीत बंब जळून खाक झाला. चालकाने तात्काळ वाहनातून उडी घेतल्याने तो बचावला. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.