
>>अनिरुद्ध प्रभू
आपण जेव्हा पुस्तक खरेदी करतो किंवा बघतो तेव्हा मलपृष्ठावर असलेले हे 13 आकडे आणि एक बारकोड आपले लक्ष वेधून घेत असले तरी त्यातून आपल्याला काहीही कळत नाही, कळणार नाही हे आपण मान्य करून पुढे जात असतो. त्याची गरज, इतिहास आणि आजचे रूप याबद्दल आपल्याला काही ठाऊक नसते. आज आपल्या हाताशी असणाऱया प्रत्येक गोष्टीमागे, प्रणालीमागे, व्यवस्थेमागे काहीतरी कथा असतेच. तशीच या ISBN ची ही कथा!
साधारण 1440 मध्ये गोल्डस्मिथ जोहांस गुटनबर्ग या वल्लीनं नव्या तंत्राच्या, वेगवान छापखान्याचा ढाचा बनवला आणि छपाईच्या क्षेत्रात खऱया अर्थानं क्रांती झाली. पुस्तकं त्याही आधीपासून अस्तित्वात असली तरी पुस्तकांचा व्यवसाय या घटनेनेच सुरू झाला असे ठामपणे म्हणता येईल. प्रचंड मोठय़ा प्रमाणावर छापलं आणि अर्थातच विकलं गेलेलं पहिलं पुस्तक कुठलं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या गुटनबर्गला अमर करणारं नाव आहे – B42 अर्थातच गुटनबर्ग बायबल. इथून पुस्तकांचा खरा प्रवास सुरू झाला. 1440 च्या सुमारास छापखाना अस्तित्वात आला असला तरी पुस्तकांचं दुकान उघडायला काही काळ गेला. आता ज्ञात असलेलं सगळ्यात जुनं पुस्तकाचं दुकान Librairie nouvelle d`Orl]ans (सध्याचं नाव New Orleans Bookstore) हे ओरलेयन्समध्ये 1545 मध्ये सुरू झालं. जवळपास 100 वर्षांनी, दुसरं Livraria Bertrand हे ब्रिस्बन, पोर्तुगालमध्ये 1732 ला सुरू झालं. दोन्ही दुकानं आजही सुरू आहेत हे विशेष! याआधी काही दुकानं सुरू झाली असावीत, पण त्याबद्दल काही माहिती सापडत नाही. याचदरम्यान 1792 मध्ये हेन्री वॉल्टन स्मिथ आणि त्याची बायको अॅन यांनी लंडनमध्ये छोटं वर्तमानपत्र आणि मोजकी पुस्तकं मिळतील असं दुकान टाकलं. या W. H. Smithveb मुळे सबंध जगातला पुस्तक व्यवहार बदलला; त्याचीच ही गोष्ट.
हेन्री पुढे लगेचच वारला, अॅननं अजून एक भागीदार घेऊन 1812 पर्यंत दुकान सांभाळलं आणि ती ही 1816 मध्ये गेली. त्यांचा मुलगा विलियम सीनियरनं दुकानाचं नाव बदलून स्वतःच्या नावावर ठेवलं – W. H. Smith. त्याने 1846 पर्यंत धंदा सांभाळला. विलियम जुनियरनं 1848 ला धंदा ताब्यात घेतला आणि नाव ठेवलं W. H. Smith & Sons. तिथून 1992 पर्यंत स्मिथ फॅमिली या कंपनीशी निगडित राहिली. आज ही कंपनी जगातली सगळ्यात मोठी रिटेल स्टेशनरी कंपनी आहे, फायद्यात आहे हे विशेष!
गोष्ट आहे 1965 मधली कंपनीचा व्याप आणि आवाका फार वाढला होता. देशभरात बहुतांश ठिकाणी त्यांची दुकानं होती. यानंतर पुढे पुस्तकांची संख्या वाढली तशी त्यांना हिशेब ठेवणं, स्टॉक मोजणं कठीण जाऊ लागलं. अशातच त्यांनी जाहीर केलं की, 1967 पासून ते पुस्तकांच्या व्यवस्थापनासाठी एक प्रमाण प्रणाली व्यवस्था वापरायला सुरू करतील. या जाहीरनाम्यानं पुस्तक क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली. याच सुमारास इंग्लंडमधला अजून एक प्रकाशक विली (Wiley) त्याच्या गोदामासाठी तशीच एक प्रणाली शोधत होता. तर तिसरीकडे W. H. Smith ची घोषणा ऐकून प्रकाशक संघ युनायटेड किंगडम आणि आयर्लंडमधल्या पुस्तकांसाठी एक प्रणाली बनवण्याचा विचार करू लागले. या तिन्ही कामांसाठी एकाच माणसाकडे अनेकांनी बोट दाखवलं, लंडन स्कूल ऑफ इकानॉमिक्समधले संख्याशास्त्र आणि संगणकीय अभ्यास या विषयाचे प्राध्यापक गॉर्डन फॉस्टर यांच्याकडे. अर्थातच त्यांनी हे काम स्वीकारलं.
फॉस्टर हेदेखील एक रोचक प्रकरण आहे. गरीब गॅरेज मेपानिकच्या घरात जन्मलेले फॉस्टर बेलफास्ट युनिवर्सिटीमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांना काय करावं हे कळत नव्हतं. काही काळ मेडिसीनमध्ये काम करून पुढे ते कला शाखेत आले आणि गणितातून पदवीधर झाले. लगेच त्यांना MI6 ने नोकरी दिली. तिथे ते प्रसिद्ध गणितज्ञ आणि आजच्या संगणकाचे जनक अॅलन टय़ूरिंगच्या हाताखाली काम करू लागले. पुढे 1948 साली युद्ध संपल्यावर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि ते संभाव्यता या गणिती संकल्पनेवर संशोधन करून प्रोफेसर झाले. काही वर्षांनी त्यांची भेट पुन्हा अॅलन टय़ूरिंगशी झाली. याच काळात त्यांना लंडन स्कूल ऑफ इकानॉमिक्सनं प्राध्यापक म्हणून रुजू करून घेतलं आणि त्यांनी ब्रिटिश सरकारसाठी जुगारावर नियंत्रण आणणारी एक व्यवस्था निर्माण केली. त्याच्याच आधारावर त्यांच्या OR अर्थात ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये आजच्या फेमस फॉस्टर थेरमचा जन्म झाला.अशा विद्वान माणसाकडे हे पुस्तकांसाठी नवीन प्रणाली बनवण्याचं काम आलं. या प्रणाली बनवण्यात एकच अडचण होती ती म्हणजे त्याकाळी प्रचलित असलेल्या सगळ्या माहितीचा वापर यात व्हायला हवा अशी ती बनवून घेणाऱया संस्थांची मागणी होती. काम कठीण होतं, पण फॉस्टर यांनी वर्षभरात ते सोडवलं आणि त्याला नाव दिलं SBN अर्थात Standard Book Number. हा एक नऊ अंकी क्रमांक असून यात प्रकाशक, पुस्तक, विभाग इत्यादींना प्रत्येकी विशिष्ट संख्येचा कोड दिला गेला. ही व्यवस्था 1970 पर्यंत चालली. जी पुढे अमेरिकेने 1968 साली कॉपी करून तिकडेही राबवली.
1968पासून ISO (International Organization for Standardization) चे या उद्योगाकडे लक्ष होतेच. त्यांनी 1969 मध्ये परत फॉस्टर यांनाच पाचारण करून ही प्रणाली जागतिक वापरासाठी कशी सज्ज करता येईल यावर काम करण्यास सुचवलं आणि 1970 सालापासून 9 अंकांचा SBN एक अंक शून्य लावून ISBN DeLee&le International Standard Book Number म्हणून जागतिक पातळीवर वापरला जाऊ लागला. 1972, 1990 आणि 2007 अशा तीन सुधारणा आजपर्यंत या प्रणालीत झालेल्या आहेत. पहिल्यांदा 10 आकडय़ांचा असणारा हा क्रमांक 1 जानेवारी 2007 पासून 13 आकडी झाला आहे आणि त्यासोबत एक बार कोडदेखील दिला जाऊ लागला आहे. GS1 या प्रसिद्ध बारकोड कंपनीने ही नवीन व्यवस्था बनवण्यात मोलाचं सहकार्य केलं आहे.
आपण जेव्हा पुस्तक खरेदी करतो किंवा बघतो तेव्हा मलपृष्ठावर असलेले हे 13 आकडे आणि एक बारकोड आपलं लक्ष वेधून घेत असले तरी त्यातून आपल्याला काहीही कळत नाही, कळणार नाही हे आपण मान्य करून पुढे जात असतो. त्याची गरज, इतिहास आणि आजचं रूप याबद्दल आपल्याला काही ठाऊक नसतं. आज आपल्या हाताशी असणाऱया प्रत्येक गोष्टीमागे, प्रणालीमागे, व्यवस्थेमागे काहीतरी कथा असतेच. तशीच या ISBN ची ही कथा. समजा W. H. Smith काय किंवा Wiley किंवा ISO या कुणालाच वाढत जाणाऱया पुस्तकांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न पडला नसता तर आज आपण अगदी एका क्लिकवर पुस्तकं ज्या सहजतेने शोधतो आणि मागवतो, ती सहजता आपल्या आयुष्यात आली असती का? विचार करायला हरकत नाही.
[email protected]
(लेखक पुस्तक व्यवसायक्षेत्रात कार्यरत आहेत.)