
विरार ते जलसार अशा बहुचर्चित रो-रो सेवेला उद्या शनिवारपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात होणार आहे. त्यामुळे रस्ते प्रवासाला लागणारा दीड तासाचा वेळ कमी होणार असून विरार ते जलसार अवघ्या 15 मिनिटांत पोहोचता येणार आहे. या जलद प्रवासामुळे पालघर जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खारवाडेश्री (जलसार) ते नारंगी हे रस्त्याचे अंतर 60 किलोमीटरचे असून सर्वसाधारणपणे या प्रवासासाठी दीड तास लागतो. मात्र जलमार्गाने हाच प्रवास 15 ते 20 मिनिटांचा होणार आहे. या सेवेमुळे पालघर व वसई तालुक्यातील नागरिकांच्या प्रवास वेळेत मोठी बचत होणार आहे. या जलमार्गामुळे वसई-विरार ते सफाळा-केळवा परिसरात प्रवास करणे सुलभ होणार असल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल अशी शक्यता आहे. पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून विरार येथून रस्तामार्गे 70 किलोमीटरवर असणारे हे अंतर या जलमार्ग सोयीमुळे निम्म्यावर येईल.
दर पंधरा मिनिटांनी सेवा
उद्यापासून सुरू होणारी रो-रो सेवा सकाळी साडेसहा वाजता विरार येथून तर सफाळे जलसार येथून 6.45 वाजता सुटेल दर पंधरा मिनिटांच्या अंतरावर सकाळ, दुपार व रात्री ही सेवा सुरू राहणार आहे. शेवटची सेवा विरारपासून 10 वाजता तर जलसारपासून 10 वाजून 10 मिनिटांपर्यंत राहणार आहे. रो-रो जेटी व तत्सम सुविधा निर्माण करण्यासाठी 23.68 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जेट्टीपासून विरारच्या दिशेने येणाऱ्या साडेतीन किमी रस्त्यासाठी 30 कोटी खर्च करण्यात येणार आहे. तर आठ कोटी रुपये खर्चुन वाहनतळ उभारण्यात येणार आहे. एका फेरीत 100 प्रवासी आणि 33 वाहने वाहून नेण्याची क्षमता फेरी बोटीची असेल.
रो-रो सेवेचा दर
सायकल 10 रुपये, मोटारसायकल (चालकासह) – 66 रुपये, रिकामी तीनचाकी रिक्षा (चालकासह) 110 रुपये, चारचाकी कार (चालकासह)-200 रुपये.
प्रवासी वाहन किंवा अवजड वाहन 220 रुपये.
मोठी प्रवासी वाहने 275 रुपये.
रिकामी पॅसेंजर बस, ट्रक, ट्रॅक्टर 330 रुपये.
रिकामी मालवाहू ट्रक व जेसीबी 550 रुपये.
पशू प्रति नग 55 रुपये, मासे, पक्षी, कोंबडी, फळे इ. (प्रति टोपली) व कुत्रा, शेळी, मेंढी (प्रति नग)- 40 रुपये. प्रवासी प्रौढ (12 वर्षांवरील) -30 रुपये. प्रवासी लहान (3 ते 12 वर्षांपर्यंत) 15 रुपये.