
मी शिक्षक आहे. तुमच्या मुलीला शाळेत घेऊन जातो, तिला गणवेश, आधार कार्ड मिळवून देतो तसेच दोन हजार रुपयेदेखील मिळतील असे सांगून एका नराधमाने आदिवासी मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. शहापूर तालुक्यातील वालशेत गावात हा प्रकार उघडकीस आला असून पोलीस या नराधमाचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शहापुरातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वालशेत ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या पाड्यामध्ये एका घराजवळ एक अनोळखी बाईकस्वार आला. मी वालशेत शाळेतील शिक्षक असून तुमच्या मुलीला शाळेत घेऊन जातो आणि पैसेही देतो असे आमिष पीडित मुलीच्या आईला दाखवले. शिक्षक असल्याचे सांगितल्याने आईचा त्यावर विश्वास बसला. तिने मुलीला शाळेत घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर बाईकस्वार शाळेत घेऊन जाण्याऐवजी त्या मुलीला पडघा ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
दुकानातून फोन केल्याने वाचा फुटली
पीडित मुलीने कसेबसे स्वतःला सावरत दुकान गाठले आणि त्या दुकानातून आपल्या आईला तिने फोन करून झालेला प्रकार सांगितला. आईने त्वरित शहापूर पोलीस ठाण्यात जाऊन नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा शोध सुरू आहे.