
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर खोटा गुन्हा दाखल करून त्याला धमकी दिल्यामुळे आलेल्या नैराश्यातून कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजखेड येथील तरुणाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिन अण्णाराव वाघ (वय – 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कारागृह पोलीस दलात भरती झालेली मैत्रीण, तिचे वडील व तरुणीचा प्रियकर यांनी नोकरीला लागू न देण्याची धमकी दिल्याने, खोटा गुन्हा दाखल केल्याने आत्महत्या केली. तरुणाच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले असल्याचे आढळून आले.
सचिनने सुसाईड नोटमध्ये करंजखेडा येथील तरुणी, तिचे वडील व तरुणीचा प्रियकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सचिन हा करंजखेडा गावचे पोलीसपाटील दिलीप वाघ यांचा भाऊ आहे. तो तीन वर्षांपासून गावात पोलीस भरतीची तयारी करत होता. यावेळी गावातीलच तेजश्री सुभाष पवार ही तरुणीसुद्धा पोलीस भरतीच्या तयारीसाठी जात होती. तीन ते चार महिन्यांपूर्वी तेजश्री ही कारागृह पोलीस नागपूर येथे भरती झाली. जास्त सराव व्हावा यासाठी सचिनने सुद्धा छत्रपती संभाजीनगर येथे एका करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला.
दरम्यानच्या काळात सचिन हा तेजश्रीला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, तेजश्री त्याला प्रतिसाद देत नव्हती. तेजश्रीचे वडील सुभाष पवार यांनी मंगळवारी पिशोर पोलीस ठाणे गाठून सचिन विरुद्ध धमकावणे, शिवीगाळ करणे, त्रास देणे याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे सचिन तणावात होता. बुधवारी सर्व जण झोपलेले असताना रात्री अडीच वाजता जाग आली असता सचिन घरात नसल्याचे आढळून आले. त्याचवेळी त्याच्या फोनवर मी आत्महत्या करत असल्याचे स्टेटस दिसत असल्याचे आढळून आले.
यामुळे कुटुंबातील सदस्यांनी त्याचा शोध घेतला असता रामेश्वर मंदिराजवळ एका लिंबाच्या झाडाला त्याने दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याच्या खिशात सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली असून त्याचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. या संदर्भात तेजश्री पवार, सुभाष पवार व तेजश्री पवारचा प्रियकर यांच्यावर पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.