उद्योगविश्व- आगळेवेगळे नॅपकिन बुके

>> अश्विन बापट

सर्वसाधारणपणे सभा, समारंभ किंवा लग्न सोहळा, वाढदिवस… अशा सोहळ्यात पुष्पगुच्छांची देवाणघेवाण करत या कार्यक्रमांची गोडी द्विगुणित केली जाते. अलीकडे फुलांच्या गुच्छांऐवजी नॅपकिन बुके अर्थात नॅपकिन गुच्छ देण्याची संकल्पना जोर धरत आहे. या नॅपकिन गुच्छाचा व्यवसाय करणारी युवा उद्योजिका मानसी पोळ हा व्यवसाय आणखी फुलविण्याचे ध्येय बाळगून आहे.

सोलापूर आणि परिसरात अशी अनेक मंडळी नॅपकिन बुके तयार करताना पाहायला मिळतात. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कामोठय़ातही उद्योजिका होऊ पाहणाऱया तरुणीने या नॅपकिन बुकेची हटके वाट चालायचं ठरवलंय. तिचं नाव मानसी पोळ! तिच्या एस नॅपकिन बुके या ब्रँडने आता हळूहळू जम बसवायला सुरुवात केली आहे. तिच्या या वाटचालीत वडील गोरखनाथ पोळ आणि आई सविता पोळ यांचं तसंच कापड व्यवसायात असलेल्या मानसीच्या काकांचंही मोलाचं मार्गदर्शन आणि सहाय्य लाभत आहे.

“या व्यवसायाचा विचार मानसी आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनात कसा आला?’’ असं विचारलं असता गोरखनाथजी म्हणाले, ही गोष्ट 2022 मधल्या नवरात्रोत्सवादरम्यानची आहे. आम्ही एका लग्न सोहळ्यासाठी पुण्याला  गेलो होतो. तेव्हा तिथे स्टेजवर वधूवरांसाठी अनेक मंडळींनी पुष्पगुच्छ आणले होते. जे काही सेकंद हातात घेऊन बाजूला ठेवले जात होते. नंतर त्याकडे कुणी पाहातही नव्हते. इतक्या मेहनतीने साकारलेले ते गुच्छ असे दुर्लक्षित झालेले पाहून मानसी आणि आम्हा साऱयांच्याच मनाला ते लागलं. तिथूनच जन्म झाला एस
नॅपकिन बुकेचा. मानसी सध्या मास मीडिया कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स करतेय. याचबरोबर  उद्योजक होण्याचं, नवं काहीतरी करू पाहण्याचं स्वप्न ती बळगून आहे. यासाठी तिच्या पंखांना बळ देण्याचं काम आम्ही करतोय. आमच्या या स्टार्टअपला आता सव्वातीन वर्षं पूर्ण झालीत. मानसीने सुरुवात सिंगल गुलाब बुकेपासून केली. आजच्या घडीला ती आणि तिची टीम, ज्यात प्रामुख्याने महिला आहेत, ही मंडळी तब्बल 42 प्रकारचे वैविध्यपूर्ण नॅपकिन गुच्छ साकारतात, ज्याची किंमत 50 रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत आहे. किंमत लोकांना परवडावी यादृष्टीने आम्ही त्याचे दर ठेवलेत. कामोठे तसंच ठाण्यातही आता याचं उत्पादन सुरू करण्यात आलंय. आमच्याकडे तीन पगारी कर्मचारी आहेत, याशिवाय 8 ते 15 महिला या नॅपकिन बुकेचं काम रोजंदारीवर करत असतात. ज्यात बुकेंच्या मागणीनुसार संख्येत चढउतार होत असतो. एक महिला अंदाजे 15 ते 20 बुके दिवसाला बनवते. हे बुके तयार करण्यासाठी नॅपकिनसह पुठ्ठा, पेपर व सेलो टेप हा कच्चा माल आवश्यक असतो. नवी मुंबई, महाड, रायगड, उरण, ठाणे, कल्याण अशा विविध ठिकाणी आमच्या बुकेंना चांगलीच मागणी आहे.

या SNB स्टार्टअपची संचालिका मानसीने सांगितलं, “माझ्या मीडिया कम्युनिकेशन कोर्समध्ये शिकवण्यात येत असलेल्या क्रिएटिव्हिटीच्या संकल्पना मी या नॅपकिन बुके निर्मितीत कशा वापरता येतील, याचा विचार करते. सध्या नॅपकिन बुकेसोबतच काही जण लोकरीचेही बुके बनवू लागलेत. त्यामुळे अपडेट होत राहणं तसंच या व्यवसायाला पूरक असणाऱया गोष्टी आणि  आर्थिक गणित सांभाळणं तसंच व्यवसायवृद्धी करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.’’ तर व्यवसायाचा आर्थिक गणिताचा मुद्दा पुढे नेताना गोरखनाथजी म्हणाले, “मुंबई, नवी मुंबईच्या बाहेरूनही आम्हाला या बुकेंसाठी विचारणा होत असते, पण डिलिव्हरीसाठी लागणाऱया प्रवास खर्चाचं गणित परवडण्याजोगं नसल्याने आम्ही या व्यवसायाचा विस्तार करू शकलो नाही. मुंबईची लोकल जिथे पोहोचते तिथपर्यंत सध्या आम्ही नॅपकिन बुके विक्री करतोय. व्यवसायाचं आर्थिक गणित बसवण्याच्या दृष्टीने आता मानसीने विविध शाली तयार करून त्याची विक्री करत
प्रॉडक्ट रेंज वाढवली आहे.’’

‘आता आनंद मिळवा समारंभानंतरही’ या स्लोगननुसार नॅपकिन बुकेमधले नॅपकिन हे समारंभानंतरही उपयुक्त ठरतात. साहजिकच बुके देणाऱयाला आणि घेणाऱयालाही त्याचा आनंद मिळत असतो. भविष्याचा विचार करता व्यवसायवृद्धी करत असतानाच आणखी जास्त संख्येने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं ध्येय मानसीने समोर ठेवलंय, असंही गोरखनाथ यांनी आवर्जून सांगितलं.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर सीनियर न्यूज अँकर आहेत.)