
>> महेश राजगुरू
महेश राजगुरू संपादित डॉ. संजय हिराजी खैरे यांच्या जीवनातील सुवर्णक्षण टिपणारे हे पुस्तक! डॉ. खैरे हे कविमनाचे. कवी हे शब्दप्रभू असतात; मात्र प्राध्यापक डॉ. खैरे हे विद्यार्थी प्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच डौल प्राप्त होतो. शिक्षक हा खऱया अर्थाने राष्ट्राचा निर्माता असतो. तो विविध प्रकारचे नागरिक घडवत असतो. ते घडवत असताना, आपल्या विद्यार्थ्यांप्रती प्रेम, स्नेह आणि समर्पित भावना असणे, हे काही विरळच आहे. त्यामुळे खैरे सरांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे विद्यार्थ्यांना वाढवणारे, घडवणारे, त्यांना उभे करणारे असेच आहे.
या पुस्तकाची सुरुवात संपादक महेश राजगुरू यांच्या प्रस्तावनेने होते. त्याचबरोबर या पुस्तकासाठी आदरणीय ज.वी. पवार, माननीय आनंदराज आंबेडकर, ना. सुनील तटकरे, आयु.मा. रमाकांत जाधव, अशोक चाफे अशा अनेक मान्यवरांचे शुभेच्छा संदेश लाभलेले आहेत; ज्यामधून खैरे सरांच्या जीवनातील किलबिलणारी शब्दांची जणू पंगतच मांडलेली आहे. विद्यार्थ्यांनी विविध लेखांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून दिला आहे.
हे पुस्तक यासाठी देखील सर्वांना आवडेल की, शिक्षक कसा असावा? शिक्षकाने विद्यार्थी कसे घडविले? त्याचबरोबर विद्यार्थी कसे असावेत? विद्यार्थ्यांची शिक्षकांप्रती असलेली निष्ठा ही या लेखातून प्रतीत होते. सध्याच्या धावपळीच्या युगात आत्मकेंद्री शिक्षक आणि आत्मकेंद्री विद्यार्थी आपल्याला पाहावयास मिळतात किंवा स्वार्थाच्या बाजारात हरवलेलेही, कितीतरी दिसतात. या दृष्टीने पाहता सरांचे जीवन हे,‘आनंद देत जावा आणि आनंद घेत जावा’ असेच आहे. तसेच सरांचे विद्यार्थी, ‘आम्हाला जगायला शिकवलं’ या भावनेने सरांच्या विश्वात त्यांच्या परिघामध्ये खिळून राहिलेले आहेत. ही मोठी जमेची बाजू आहे.
प्रा. रोहिदास मोरे यांना ते चैतन्याचा खळखळता झरा वाटतात, तर प्रा. विद्या तोरसकर यांना ते उत्कृष्ट वत्ते वाटतात. मुंबई सकाळचे प्रमुख आणि सरांचे विद्यार्थी संदीप पालवे यांना सर कविमनाचे उमदे प्राध्यापक वाटतात; तर रेश्मा मोरे यांना एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व वाटते. आशिष गाडे यांना ते समाजभूषण वाटतात; तर छाया कवितके यांना आमचे प्रेमळ सर म्हणून त्या कौतुक करतात. तर जनक शिंदे आपल्या काव्यातून खैरे सर कौन है? याचा परिचय करून देतात. सरांचे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये आहेत. उच्चपदस्थ आहेत आणि त्यामुळे आपल्या यशस्वीतेचे श्रेय सरांना देताना शशांक मोहिते, जयेश पवार, संदीप कांबळे यांनी त्यांच्या जीवनातील सरांचे महत्त्व विधित केले आहे. तर अर्चना कांबळे यांना शब्दाशी ठाम असणारे सर वाटतात; तर त्यांचे बंधू रवींद्र खैरे मिठाला जागलेला माणूस असे त्यांचे वर्णन करतात. सरांच्या जीवनातील अनेक बरे वाईट प्रसंग त्यांनी प्रभावीपणे लिहिले आहेत. त्यामुळे डॉ. खैरे आपल्याला त्यांच्या स्वभावासह समजतात. सरांच्या विद्यार्थिनी प्रेरणा कांबळे या त्यांच्यामध्ये कवी शोधतात. तर शक्ती भिसे यांना ते जीवनाचे मार्गदर्शक वाटतात. प्रा. सिद्धार्थ रायबोले यांनी त्यांच्या नजरेतून खैरे सरांचे वर्णन केले आहे. तर सरांचे मानस पुत्र प्रा. डॉ. अक्षय कासारे यांना ते जीवनाचे आधारस्तंभ वाटत आहेत. रेश्मा जंगम, योगेश कांबळे यांनी देखील आपल्या या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. या पुस्तकाचे आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे, सरांच्या पत्नी ज्या कवी, लेखक नाहीत; मात्र तरी देखील आपल्या पतीविषयी बोलत आहेत. तर तेजल कांबळे यांना ते प्रेरणास्त्राsत वाटतात. यामध्ये छोटय़ा मंडळींचे देखील लेख आहेत. त्याच्यामध्ये मृण्मयी, विहान यांनी आपल्या बालबोधातून काकांचे व्यक्तिमत्त्व उलगडले आहे. धनाजी शेळके, दुसरे मानसपुत्र प्रा. अक्षय कांबळे अशा सरांच्या विद्यार्थ्यांनी सरांच्या व्यक्तिमत्त्वावर भरभरून आपले मत व्यक्त केलेले आहे. प्रा. डॉ.राज सोष्टे जे सरांना आपले मोठे बंधू मानतात. त्यांनी देखील सरांविषयी प्रेमपूर्वक विचार मांडले आहेत.
सर एक उत्तम शिक्षक आहेतच. तसेच उत्तम कवी सुद्धा आहेत.जेष्ठ अभिनेते अशोक चाफे यांनी सरांचे वक्तृत्व, समाजामध्ये बुद्ध, धम्म आणि संघाचा प्रचार, प्रसार करणे असे काही वेगळे गुण विशेषत्वाने सांगितलेले आहेत. एकंदरीत सरांचे व्यक्तिमत्त्व हे अष्टपैलू आहे. याचे अत्यंत भावपूर्ण वर्णन प्रत्येक लेखातून येते. सरांचा प्रत्येक विद्यार्थी त्यांच्याविषयी भरभरून बोलतो. यातच खऱया अर्थाने सरांचा मोठेपणा दिसून येतो. कृतज्ञतेपोटी आपल्या गुरुजनांवर लिहिलेली ‘स्पंदन’सारखी मोजकीच पुस्तके आपल्याला पाहायला मिळतील.
स्पंदन
संपादक ः महेश राजगुरू
संकल्पना आणि संकलन ः
प्राध्यापक अक्षय कांबळे
प्रकाशन ः मृदुला प्रकाशन, नालासोपारा