
हिंदुस्थानातील ऑन्जिओप्लास्टीचे जनक अशी ओळख असलेले विख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. मॅथ्यू सॅम्युअल कालारिकल यांचे आज निधन झाले. चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात अल्पशा आजारावरील उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने हृदयाचा जादूगार हरपला, अशी हळहळ वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त होत आहे.
देशातील अनेक राजकीय नेते व उद्योगपतींवर त्यांनी उपचार केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ऑन्जिओप्लास्टी डॉ. मॅथ्यू यांनीच केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हृदयाविषयीच्या तक्रारींवरही त्यांनी वैद्यकीय उपचार केले. मॅथ्यू यांच्या निधनाबद्दल उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
डॉ. मॅथ्यू कालारिकल यांनी 1986 मध्ये हिंदुस्थानमध्ये पहिली अँजिओप्लास्टी यशस्वीपणे केली. डॉ. मॅथ्यू यांच्यामुळेच आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासह अनेक देशांमध्ये अंजिओप्लास्टी सुविधाची उभारणी करण्यात मोलाची कामगिरी बजावली होती.
अनेक प्रतिष्ठत पुरस्कारांनी गौरव
अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱया डॉ. मॅथ्यू यांनी अँजिओप्लास्टी आणि हृदयरोगावर उपचार करून अनेकांना जीवदान दिले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा अनेक प्रतिष्ठत पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. यामध्ये 1996 मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठत डॉ. बी. सी. रॉय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर जून 2003 मध्ये त्यांना तामीळनाडू येथील डॉ. एम. जी. आर. वैद्यकीय विद्यापीठाने मानद डॉक्टरेट ऑफ सायन्स अशी पदवी दिली. ते 1995 ते 1997 या कालावधीत आशियाई- पॅसिफिक इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीचे अध्यक्षही होते.
सर्वसान्यांचा आधारवड गेला
अँजिओप्लास्टी आणि हृदयरोगतज्ञ असलेल्या डॉ. मॅथ्यू यांनी राजकीय नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींवर उपचार केलेच, शिवाय सामान्य रुग्णांनानाही डॉ. मॅथ्यू आधारवड वाटत होते. तसेच हृदयरोगतज्ञांसाठी ते नेहमीच मार्गदर्शन करायचे. त्यांची नेहमीच दुसऱयाला मदत करण्याची भूमिका असायची असे लीलावतीचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. हरेश मेहता यांनी सांगितले.