
कोरोनासारख्या महामारीच्या काळातदेखील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठी ठेकेदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांनी आमची बिले कधीही न थकवता वेळेत दिली. मात्र तिजोरीत खडखडाट असूनही कोटीच्या कोटींची कंत्राटे काढणाऱ्या सध्याच्या फडणवीस सरकारने राज्यातील ठेकेदारांची तब्बल 89 हजार कोटींची बिले थकवली आहेत. आमचे पैसे ट्रिपल इंजिन सरकारने लवकरात लवकर दिले नाहीत तर विकासकामेच रोखून धरू, असा निर्वाणीचा इशारा राज्य कंत्राटदार महासंघ व अभियंता संघटनेने आज दिला.
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील ठेकेदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वारंवार मागणी करूनही फडणवीस सरकारने त्यांचे पैसे थकवल्याने कंत्राटदारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. आज ठाण्यात कंत्राटदार महासंघाचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडले. त्यात ठेकेदारांवरील अन्यायाचा पाढा वाचण्यात आला. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील अनुभव सांगितले.
कोरोनाच्या महामारीत अनेक अडचणी येऊनदेखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ठेकेदारांच्या पाठीशी उभे राहून त्यांना हिंमत दिली. तुम्ही विकासाची कामे सुरू ठेवा. बिले वेळेत मिळतील असे आश्वासनही दिले. त्यानुसार त्यांनी सर्व ठेकेदारांची बिले वेळेमध्ये दिली असल्याची बाब अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी निदर्शनास आणली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सध्याच्या फडणवीस सरकारचा अनुभव अतिशय वाईट असून आमची हक्काची रखडलेली हजारो कोटींची बिले का दिली जात नाहीत? मात्र आता हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. रखडलेली बिले दिली नाहीत तर विकासकामेच रोखून धरू, असा थेट इशारा आजच्या अधिवेशनात सरकारला देण्यात आला.
- ठेकेदारांना कामाच्या केवळ पाच टक्के रक्कमच मिळणार आहे. परिणामी ठेकेदारांनी जगायचे कसे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याचा परिणाम राज्यातील विकासकामांवर होणार आहे.
- ठाण्यात झालेल्या अधिवेशनास संजय मैड, राजेश देशमुख, अनिल पाटील, सुबोध सरोदे, सुरेश पाटील, प्रकाश पांडव, अनिल नलावडे, मंगेश आवळे यांच्यासह 29 जिह्यांतील संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
…तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार
ठेकेदारांची बिले देण्यासाठी फडणवीस सरकारकडे पैसे नसतील तर केंद्राकडून त्यासाठी कर्ज घेणे आवश्यक आहे. पण केंद्रदेखील या सरकारला खेळवत आहे. लवकरात लवकर बिले दिली नाहीत तर सरकारला कायदेशीर नोटीस बजावणार असून वेळ पडल्यास न्यायालयाचे दरवाजेदेखील ठोठावू, असा इशारा कंत्राटदार महासंघाने दिला आहे.
कोरोनाच्या महामारीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठी ठेकेदारांच्या पाठीशी उभे राहिले होते, परंतु आता महिनोन्महिने आमच्या बिलांचे पैसे रोखून धरले जात आहेत. हे खपवून घेणार नाही.
- राज्यात 89 हजार कोटींची विकासकामे झाली आहेत, पण ठेकेदारांची बिलांची रक्कम देण्याकरिता राज्य शासनाने केवळ 4 हजार कोटींचा निधी दिला आहे.