
“आता मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. पण लहानपणापासून मी शिवसेनेची वाटचाल पाहत आलोय. राजकीय हाणामारी होत असतात आणि त्या झाल्याच पाहिजेत. हाणामारी म्हणजे दंगली म्हणत नाही, पण मतभेत, मतभिन्नता, आंदोलनं असतात. त्यावेळी काँग्रेसचा जमाना होता. पोलिसांकडून शिवसैनिकांना धमक्या यायच्या की, तू हे बंद कर, काँग्रेसमध्ये ये नाही तर, टाडा लावतो. आता सुद्धा तेच चाललं आहे. आता सुद्धा पोलिसांचा वापर आपल्या टोळीतील लोकांसारखा केला जातोय आणि पक्ष फोडले जात आहेत”, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.
आज ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्या ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘थरार’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक-पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, दै. ‘सामना’चे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत, माजी खासदार-पद्मश्री कुमार केतकर, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर ही टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, सत्ताधाऱ्यांकडून जुनी प्रकरणे उखडून काढली जात आहेत. समोरील पक्ष हे नामोहरण करण्याचं काम चाललं आहे. कुठे आपण चाललो आहोत? आपण फक्त जातोय, याचा शेवट काय होणार आहे? मी मुख्यमंत्री असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, जर पोलिसांना फ्री हॅन्ड दिला तर, पोलीस चमत्कार करू शकतात. इतका विश्वास माझा आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर तेव्हा ही होता आणि आजची आहे. मात्र फ्री हॅन्ड न देता तुम्ही नको तिथे पोलिसांचा बंदोबस्त लावता. ज्यांना गरज नाही त्यांना संरक्षण दिलं, ज्यांना टिपायला पाहिजे, ते मोकळे फिरतायत. गेले दोन दिवस पाण्यासाठी आपण जे आंदोलन केलं, तिथे आंदोलनं होऊ नयेत म्हणून तिथे पोलीस बंदोबस्त होता. आपण समाजासाठी जे काम करतोय त्यासाठी पोलीस आहेत. पण पाण्याचं आंदोलनं होऊ नये म्हणून पोलिसांचा वापर राज्यकर्ते करणार असतील तर मग पोलिसांनी काय करायचं?
यावेळी प्रभाकर पवार यांचं कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “प्रभाकर पवार तुम्ही उत्तम लिखाण केलं आहे. पुस्तक उत्तम झालं आहे. आम्ही आपलं वाचत जातो, तुम्ही कसं काय रंजक लिहिता त्याचं रहस्य आता संजय राऊत यांनी सांगितलं. गेल्या ‘तीन दशकातील थरार’, हे खरं आहे. दहशकाप्रमाणे काळ बदलत जातो, गुन्हेगारी बदलते, पोलीस बदलतात. गुन्हेगारांची शस्त्र, त्यांच्या पद्धती बदलतात. त्याचप्रमाणे पोलिसांचीही पद्धत बदलते. कुमार केतकर यांनी एक टाईम्स ऑफ इंडियाचं उदाहरण दिलं. तुम्ही म्हणाला टाईम्स ऑफ इंडिया पूर्वी कसा होता. त्यात ती (क्राईमची) बातमी आतमध्ये जायची. हल्लीच्या पेपरमध्ये हेडलाईन येते. पूर्वी होता तो टाईम्स ऑफ इंडिया, आताचे पेपर पाहिले तर ‘क्राईम्स ऑफ इंडिया’, म्हणजेच सगळीकडे क्राईमच्या बातम्या छापून येतात. त्याशिवाय पेपर चालणार की, नाही, अशी पद्धत आहे.”
उद्धव ठाकरे म्हणाले, “एक गोष्ट आपल्याला मानवीच लागेल की, ज्याला आपण ‘अंडरवर्ल्ड’ म्हणतो, ते वर्ल्ड आहेच. ही वेगळी दुनिया आहे. तुमचं पुस्तक चाळत असताना कोणाकोणाचे कसे संबंध आहे, कसे असू शकतात, हे कल्पनेच्या पलीकडलं आहे. या पुस्तकाचं सहज एक पान मी उलगडलं आणि वाचालं तर, छोटा शकील आणि न्यायाधीशांचे तुम्ही संभाषण लिहिलं आहे. एखादा गुंड थेट न्यायाधीशांना सांगतो की, ये मेरा काम कर के दो. म्हणजेच त्याला वसुली करायची होती. असे जर का संबंध असतील तर, कर्णिक यांनी सांगितल्याप्रमाणे समाजाने न्याय मागायचा कोणाकडे? हा इथून प्रश्न सुरु होतो. समाज बघतो. त्याला हजार डोळे, हात आणि पाय आहेत. मात्र जोपर्यत तो हे वापरत नाही, तोपर्यंत आपल्यावर समाज म्हणून जी जबाबदारी आहे ती सुधारणार नाही. गुन्हे घडत राहतील, गुन्हेगार वाढत राहतील.”
ठाकरे म्हणाले, “प्रभाकर प्रवास, तुमचा अभिमान आणि कौतुक आहे. तुम्ही तुमच्यातलं सातत्य निर्भिडपणाने टिकवलं आहे. या गोष्टी आपण फक्त वाचत जाणार आहोत की, यातून आपण खरंच काही करणार आहोत का? पोलीस हा एक महत्त्वाचा घटक आहे. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो. नेमकी त्यावेळी दुर्दैवाने जगातली जी सर्वात कठीण करोनाची परिस्थिती होती, ती हाताळण्याचा तो काळ होता. पण एकूण जर पाहिलं तर पोलीस हे सुद्धा एक शस्त्र आहे. त्या शस्त्राचा वापर कोण कसा करतोय, त्यावर आपला समाज निरोगी राहणार की, रोगी होणार, हे ठरत असतं.”