
यंदाच्या पावसाळ्यात वसईच्या किनारपट्टीतील भुईगाव, रानगाव, पाचू बंदर, लांगे बंदर, नवापूर या पाच गावांमध्ये समुद्राचे पाणी शिरण्याची भीती आहे. धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, पण गेल्या दोन वर्षांपासून बंधाऱ्यांची कामे लटकल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंजूर झालेले बंधारे फक्त कागदावर असून पावसाळ्यात पाणी शिरल्यास जायचे कुठे, या विवंचनेने गावकऱ्यांची झोपच उडाली आहे.
वसई तालुक्याला सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पश्चिमेच्या भागात विस्तीर्ण समुद्रकिनारे आहेत. या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर नागरिक वास्तव्य करीत आहेत. धूपप्रतिबंधक बंधारा ( संरक्षक भिंती) नसल्याने किनारपट्टीच्या भागात मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळतात. याचाच फटका हा किनाऱ्यालगत असलेल्या घरांना बसत आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः पावसाळ्यात व भरतीच्या वेळी किनाऱ्यावरील घरे, शेती, बागायती, वाळत ठेवलेली मासळी यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून संरक्षक भिंत अतिशय महत्त्वाचे आहे. या पाश्र्वभूमीवर कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
वादळांची भीती वाढली
वसई यासह इतर किनारपट्टीला यापूर्वी तौक्ते चक्रीवादळांचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये आर्थिक नुकसान स्थानिकांचे मोठे झाले होते. पावसाळा तोंडावर असल्याने ग्रामस्थांना वादळांची भीती भेडसावू लागली आहे.