
हिंदुस्थानी वंशाच्या 14 वर्षीय सिद्धार्थ नंद्याला याने एआय अॅपचा भन्नाट शोध लावला आहे. अॅपचे नाव आहे Circadian AI. फक्त सात सेकंदांच्या हार्ट साऊंड रेकार्डिंगवरून हृदयविकार ओळखणारे अनोखे अॅप आज जगभरात कौतुकाचा विषय ठरत आहे. ओरॅकल आणि एआरएम यांच्याकडून एआय सर्टिफिकेट प्रोफेशनल आहे. त्याला यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज, फ्रिस्को चेंबर ऑफ कॉमर्स यांच्याकडून पुरस्कार व सन्मानपत्रे मिळाली आहेत. सध्या सर्वच क्षेत्रांत एआयचा बोलबाला आहे. एआय जर अर्थ आणि मार्केटिंगमध्ये बदल घडवू शकतो, तर आरोग्य क्षेत्रात का नाही, हा विचार करून सिद्धार्थने कामाला सुरुवात केली. त्याने अवघ्या सात महिन्यांत Circadian AI अॅप तयार केले. या भन्नाट अॅपसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडन यांनीदेखील सिद्धार्थचे कौतुक केले आहे.
हजारो रुग्णांवर चाचणी
सिद्धार्थने तयार केलेले अॅप हॉस्पिटलमध्ये वापरण्यासाठी असून फक्त सात सेकंदांत हृदयाच्या ठोक्याचे विश्लेषण करते. विश्लेषणातून 40 पेक्षा जास्त हृदयविकारांची शक्यता वर्तवते. याची अचूकता 96 टक्के असून हिंदुस्थान आणि अमेरिकेत मिळून 15 हजारांहून अधिक रुग्णांवर याची चाचणी करण्यात आली आहे. विजयवाडा आणि गुंटूर येथील हजारो रुग्णांवर चाचणी झाली असून यामध्ये ईसीजी व इकोच्या मदतीने अंतिम निदान करण्यात आलेय. त्यामुळे सुरुवातीच्या तपासणीसाठी हे अॅप महत्त्वाचे आहे.