आई… आई… आईला नदीत वाहताना पाहून लेकीचा आक्रोश, रील बनवणं बेतलं जीवावर

एक महिला आपल्या कुटुंबासोबत फिरायला आली असताना एक दुर्दैवी घटना घडली. महिला नदीत रील बनवत असताना तिचा तोल गेल्यामुळे नदीत बुडून तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर काशीतील भागिरथी नदीजवळ घडली. 35 वर्षीय महिला उत्तरकाशी येथे तिच्या नातेवाईकांना भेटायला गेली होती. सोमवारी ती तिच्या 11 वर्षांच्या मुलीसह मणिकर्णिका घाटावर जात असताना हा अपघात झाला. यावेळी ती आणि तिची मुलगी भागिरथी नदीजवळ रील व्हिडीओ बनवण्यासाठी गेले होते. महिलेने आपला मोबाईल मुलीकडे दिला आणि ती नदीपात्रात उतरली. यावेळी पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे महिलेचा तोल गेला आणि ती नदीत बुडाली.

दरम्यान, महिलेची 11 वर्षीय मुलगी व्हिडीओ शूट करत होती. त्यामुळे हा संपूर्ण थरार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. आपली आई पाण्यात वाहून जात असताना मुलगी मम्मी- मम्मी ओरडताना व्हिडीओत दिसत आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लगेचच बचावकार्य सुरू केले. मात्र अद्यापही महिला सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.