
भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्याचा मार्ग गुजरातमधून जातो, असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोडासा जिल्ह्यातील अरवली येथे पोहोचले आहेत. यावेळी बीएपीएस स्वामीनारायण मंदिर सभागृहात जिल्ह्यातील बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.
आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की, “सध्याची लढाई केवळ राजकीय नाही तर ती भाजप-आरएसएस आणि काँग्रेसमधील वैचारिक लढाई आहे. संपूर्ण देशाला माहित आहे की, जर कोणी भाजपला हरवू शकतो तर तो फक्त काँग्रेस पक्ष आहे. जर आपल्याला देशात आरएसएस आणि भाजपला पराभूत करायचे असेल तर तो मार्ग फक्त गुजरातमधून जातो.”
कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “आपल्या पक्षाची सुरुवात गुजरातमध्येच झाली. तुम्ही आम्हाला महात्मा गांधी आणि सरदार पटेल हे महान नेते दिले. बऱ्याच काळापासून गुजरातमध्ये आपल्या हाती फक्त निराशाच आली आहे. मात्र मी तुम्हाला खात्री देण्यासाठी आलो आहे की, काहीही कठीण नाही.”, असं म्हणत त्यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणूक जिकंण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.