
जिल्ह्यात नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवणारे गाव अशी वेगळी ओळख असलेले कोरेगाव तालुक्यातील ‘बिचुकले गाव’ सध्या वेगळ्या उपक्रमामुळे पंचक्रोशीत चर्चेत आहे. ‘झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे संतुलन राखा’ असा संदेश देण्याचे काम हे गाव सध्या वेगळ्या प्रकारे करत आहे.
गेल्या काही वर्षांपासून बिचुकले गावात शुभकार्य असो की अगदी मृत्यूनंतरचे विधी असो नातेवाईक, भाऊबंद, सुवासिनींना भेटवस्तू देण्याऐवजी आता फळझाडांची रोपे देऊन हे विधी पार पाडण्याचे काम केले जात आहे. केवळ झाड देणं एवढंच न करता पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी मृत व्यक्तीच्या अस्थी पाण्यात न सोडता त्या शेतात झाड लावण्याच्या ठिकाणी विधिवत विसर्जन करून त्या जागेवर झाड लावून ते ‘आठवण’ म्हणून जोपासण्याचे काम केलं जात आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मागील काही वर्षी शासनाच्या जलयुक्त शिवार या उपक्रमातून गावाने मोठे काम केले. केवळ शासकीय योजनाच नव्हे तर सर्वांसाठी काही ना काही उपक्रम हे गाव सतत राबवत आहे.
परगावी शाळेसाठी जाणाऱ्या मुलींसाठी या गावाने सायकल बँक सुरू केली, ज्यामुळे या मुली आता सहजपणे शिक्षणाचे धडे घेत आहेत. यापूर्वी या गावाने ‘विधवा सन्मान योजना’ सुरू केली. यामध्ये सर्व विधीकार्यात विधवांना विधवा न समजता सुवासिनी म्हणून मान देण्यात आला.
गावातील पद्मा रामचंद्र पवार यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या बाराव्यानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने खांदेकरी आणि सुवासिनींना भांडी न देता आंब्याची रोपे देण्यात आली. यामुळे झाडांच्या स्वरूपात मृत व्यक्तीची आठवण चिरंतन राहणार आहे. ही परंपरा गाव अनेक वर्षांपासून जपत आहे.
सिंधू चव्हाण, ग्रामस्थ, बिचुकले