
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचाच गेल्या तीन साडेतीन शतकांपासून भाग असलेल्या गरुड मंडपाच्या पुनर्डभारणीस आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. येत्या नवरात्रोत्सवापूर्वी गरुड मंडपासह नगारखाना आणि मणिकर्णिका कुंड पुनर्वैभवावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून आता जोर धरण्यात आला आहे.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या उभारणीनंतरच्या काळात मंदिराला लागूनच समोर सन 1844 ते 1867 या कालावधीत गरुड मंडप बांधण्यात आला. श्री अंबाबाई मंदिरात भाविकांकडून होणारा अभिषेक विधी, गणेशोत्सव, विविध धार्मिक सोहळे तसेच पालखी मिरवणुकीवेळी उत्सवमूर्ती विराजमान होण्यासाठी गरुड मंडपाचा उपयोग केला जात आहे. पण दररोज होत असलेल्या अभिषेकाच्या पाण्यासह पावसाच्या पाण्याने या मंडपाच्या सागवानी खांबाचे बूड झिजले होते. तसेच वाळवी लागल्याने हा गरुड मंडप धोकादायक बनला होता. त्यामुळे सुरक्षेसाठी दोन वर्षांपासून या मंडपाचा वापर थांबविण्यात आला होता. मागील वर्षी नवरात्रापूर्वी मंडप उतरवण्यात आला. पण सागवान खांब न मिळाल्याने बरेच महिने हे काम रखडले होते.
सोमवारी (दि. 14) गरुड मंडपाच्या लाकडी खांब उभारणीच्या कामास द्वार प्रतिष्ठापना व पूर्णाहुती होम विधीने सुरुवात करण्यात आली. तर आज मंगळवारपासून प्रत्यक्ष खांब उभारणीला सुरुवात झाली आहे. शारदीय नवरात्रौत्सवापूर्वी गरुड मंडपाचे काम पूर्ण केले जाणार आहे. खांब उभारणीनंतर कमान बसवणे, तुळई लावणे आणि छत उभारण्याचे काम करण्यात येणार आहे.
गरुड मंडप पुनर्डभारणीसाठी स्वनिधीतून 12 कोटी 85 लाख 92 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दगडी मुरुमाचा वापर करून, गरुड मंडपाचा पाया मजबूत करण्यात आला आहे. हे खांब खचू नये तसेच हवामान आर्द्रता यापासून संरक्षण व्हावे यासाठी बांधकाम क्षेत्रातील अद्ययावत ऑइल प्रक्रिया करण्यात आली आहे. नव्याने बनवलेले लाकडी खांब मुरूम व दगडी मुरुमाच्या पायात रोवले जाणार असल्याने अधिक भक्कम होणार आहेत. गरुड मंडपाचे खांब उभारण्याचे काम पावसाळ्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यानंतर पुढील अंतिम टप्प्यातील प्रक्रियेला गती येणार आहे