
वडिलांनीच मुलाची सुपारी दिल्याचा आरोप असलेल्या विकासकाचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने पित्याचा 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असला तरी पुण्यात येण्यास पित्याला बंदी घातली आहे.
पुण्यातील विकासक बाळासाहेब आरगडे यांनी पोटचा मुलगा धीरज याच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाप्रकरणी बाळासाहेब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जामीन मिळावा यासाठी त्यांनी बाळासाहेब यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली तर मुलगा धीरज आरगडे याने अॅड. असीम सरोदे व अॅड. पार्थ फडतरे यांच्यामार्फत मध्यस्थी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली तेव्हा न्यायालयाने अटी-शर्तींसह विकासकाचा जामीन मंजूर केला तसेच तक्रारदार व मुलगा धीरज याच्या सुरक्षेसाठी व कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता बाळासाहेब यांना पुणे शहरात ट्रायल कोर्टातील सुनावणीव्यतिरिक्त येण्यास बंदी घातली आहे.