
लखनौविरुद्धच्या विजयानंतर चेन्नई संघाच्या जिवात जीव आला होता. मात्र, पुन्हा एकदा चेन्नईची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे कर्णधार ऋतुराज गायकवाड हा स्पर्धेतून बाहेर पडलेला असतानाच काल लखनौविरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा लंगडताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, जर धोनीची दुखापत गंभीर असेल तर ही चेन्नईसाठी चिंता वाढणारी गोष्ट ठरू शकते. त्यामुळे गुरुवारी मुंबईविरुद्ध होणाऱया सामन्यात वानखेडेवर चेन्नईला धोनीशिवायसुद्धा उतरावे लागू शकते.
आयपीएल 2025 स्पर्धा चेन्नईसाठी निराशाजनक ठरत आहे. चेन्नईला यापुढे सर्वच सामन्यात ‘करो या मरो’ची लढाई असणार आहे. चेन्नईला खेळलेल्या सात सामन्यांपैकी केवळ 2 सामन्यांत विजय मिळवता आला आहे. त्यामुळे चेन्नई आधीच दडपणात आहे. ऋतुराज संपूर्ण स्पर्धेला मुकला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा धोनीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने लखनौला पराभूत करून प्लेऑफच्या शर्यतीतील आपले आव्हान कायम राखले आहे.
लखनौविरुद्धच्या सामन्यात धोनीने तुफान फटकेबाजी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. मात्र, शेवटच्या षटकात धोनी लंगडताना दिसला होता. विजयानंतर चेन्नईच्या संघाचे हॉटेलमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळीदेखील धोनी लंगडत चालताना दिसला. ही बाब चेन्नईसाठी टेन्शन वाढवणारी आहे. धोनी दुखापतग्रस्त असेल तर कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवायची, असा प्रश्न आहे. चेन्नईसाठी प्रत्येक सामन्यात विजय मिळवणं आवश्यक असताना धोनीची अनुपस्थिती ही धोक्याची घंटा असू शकते.