
हिंदुस्थानी क्रिकेटला इंग्लंड आणि कॅरेबियन भूमीवर पहिलीवहिली मालिका जिंकून देणाऱ्या महान कर्णधार आणि अस्सल मुंबईकर अजित वाडेकर यांच्या क्रिकेटशौर्याला मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) मानाचा मुजरा करताना वानखेडे स्टेडियममधील स्टॅण्डला त्यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घेतला. त्याचबरोबर एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि हिंदुस्थानी क्रिकेटला टी-20चे जगज्जेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्माचेही नाव स्टॅण्डला दिले जाणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली.
हिंदुस्थानी क्रिकेटला परदेशात जिंकण्याची सवय लावणारे कर्णधार असा लौकिक असलेल्या अजित वाडेकर यांनी मुंबई क्रिकेटसाठीही अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीचा गौरव करण्यासाठी वानखेडे स्टेडियममधील स्टॅण्डना त्यांचे नाव दिले जावे, अशी मागणी केली जात होती. अखेर मुंबई क्रिकेटच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात वाडेकरांच्या कारकीर्दीचा सन्मान करण्याचा निर्णय एमसीएने एकमताने घेतला आहे. त्याचबरोबर एमसीए, बीसीसीआय आणि आयसीसी अशा तिन्ही क्रिकेट संघटनांचे अध्यक्षपद भूषवणाऱया शरद पवार यांच्याही कार्याचा गौरव करताना ग्रॅण्ड स्टॅण्ड लेव्हल तीनला त्यांचे नाव दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे दिवेचा पॅव्हेलियनच्या लेव्हल तीनला रोहित शर्मा स्टॅण्ड म्हणून ओळखले जाईल. एमसीएच्या एजीएममध्ये कार्यकारिणी सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी स्टॅण्डच्या नामकरणाचा प्रस्ताव मांडला आणि जितेंद्र आव्हाड यांनी त्याला अनुमोदन दिले.
एमसीए पॅव्हेलियनमध्ये अमोल काळेंच्या स्मृती
एमसीएचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी एमसीए पॅव्हेलियनमधील एमसीए ऑफिस लाऊंजला त्यांचे नाव दिले जाणार आहे. मुंबई क्रिकेटसाठी योगदान देणाऱया दिग्गजांच्या स्मृती जतन करण्याचा एमसीएने प्रयत्न केला आहे. आतापर्यंत वानखेडेवर सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर या दिग्गजांची स्टॅण्डना नावे देण्यात आली होती. क्रिकेटच्या भावी पिढय़ांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आता यात अजित वाडेकर, शरद पवार आणि रोहित शर्मा स्टॅण्डचाही समावेश झाला आहे.