
आयपीएलचा थरार सुरू असतानाच हिंदुस्थानच्या बांगलादेशच्या दौऱयाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या दौऱयात हिंदुस्थानचा संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. तब्बल अकरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हिंदुस्थानचा हा पहिलाच वन डे आणि टी-20 क्रिकेटचा दौरा असून, याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) मंगळवारी वेळापत्रक जाहीर केले. या दौऱयासाठी हिंदुस्थानचा संघ 13 ऑगस्ट रोजी ढाका येथे पोहचणार आहे. हिंदुस्थानच्या बांगलादेश दौऱयाची सुरुवात 17 ऑगस्ट रोजी मिरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याने होणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्ट रोजी मीरपूरमध्ये खेळला जाईल. तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळला जाईल. 26 ऑगस्ट रोजी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामनाही खेळला जाणार आहे. दुसरा आणि तिसरा हे दोन्ही टी-20 सामने मीरपूरमध्येच खेळवले जातील.