वक्फच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यावर घरे बांधू

मुस्लिमांच्या धार्मिक बाबींमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही, असे आश्वासन खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेतील चर्चेप्रसंगी दिले होते. परंतु, त्यांच्या या आश्वासनाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच हरताळ फासल्याचे समोर आले आहे. वक्फ कायद्याच्या निषेधार्थ बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचारावर त्यांनी प्रतिक्रिया देताना वक्फच्या जमिनीवर घरे बांधू, असा इशारा मुस्लिमांना दिला आहे. तसेच लातो के भूत बातो से नही मानते, दंगलखोर फक्त लाठय़ांचेच ऐकतील, ज्याला बांगलादेश आवडतो, त्याने बांगलादेशला जावे, असे विधानही केले आहे.

हरदोई येथील एका कार्यक्रमात योगी बोलत होते. वक्फ जमिनी परत घेतल्या जातील. या जमिनींवर रुग्णालये, गरीबांसाठी घरे बांधली जातील आणि उंच इमारती बांधल्या जातील. येथे शाळा आणि विद्यापीठे बांधली जातील आणि गुंतवणुकीसाठी लँड बँक तयार केली जाईल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.  दरम्यान, बंगाल जळत आहे, पण मुख्यमंत्री तसेच समाजवादी पक्ष आणि काँग्रेस गप्प आहेत. ममता बॅनर्जी दंगलखोरांना शांतता दूत म्हणतात आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्यांना मोकळीक दिली आहे. अशा प्रकारच्या अराजकतेला आळा घातला पाहिजे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.