प्रभादेवीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव, सिनेप्रेमींना 41 चित्रपटांची पर्वणी

प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत येत्या 21 ते 24 एप्रिल दरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला ‘मराठी चित्रपट महोत्सव’ होणार आहे. महोत्सवात तब्बल 41 चित्रपटांची मेजवानी सिनेप्रेमींना मिळणार आहे. या चित्रपटांची नावे आज घोषित करण्यात आली.

मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता होईल. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री 8 वाजता रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे 99’ या चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ होईल. तर 24 एप्रिल रोजी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाने समारोप होईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार यांनी दिली. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाटय़ मंदिर, मिनी थिएटर आणि प्रायोगिक रंगमंच येथे हे सर्व चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

  • 22 एप्रिल रोजी – सकाळी 10 वाजता ‘पळशीची पीटी’, ‘बटरफ्लाय’ आणि ‘येरे येरे पावसा’. दुपारी 1 वाजता ‘बाईपण भारी देवा’, ‘विषय हार्ड’ आणि ‘तिचं शहर होणं’, दुपारी 3 वाजता मराठी भाषेवर आधारित ‘इंटरनॅशनल फालमपह्क’, ‘ग्लोबल आडगाव’ आणि ‘या गोष्टीला नावच नाही’, सायंकाळी 6 वाजता ‘गोदाकाठ’,पाणी, आणि ‘झॉलीवूड’ तर रात्री 8 वाजता ‘भेरा’, विनोदी चित्रपट ‘चोरीचा मामला’ आणि ‘पाँडीचेरी.’
  • 23 एप्रिल रोजी – सकाळी 10 वाजता ‘बार्डे’, ‘ छबीला’ आणि शेतकरी आत्महत्येवरील ‘तेरव’. दुपारी 1 वाजता ‘पोटरा’, ‘गिरकी’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’. दुपारी 3 वाजता ‘जयंती’, ‘गाभ’ आणि ‘फनरल’ तर सायंकाळी 6 वाजता ‘स्थळ’, ‘अमलताश’ आणि ‘कुलुप’. रात्री 8 वाजता ‘मी वसंतराव’ हा बायोपिक, ‘बापल्योक’ आणि ‘गोदावरी.’
  • 24 एप्रिल रोजी – सकाळी 10 वाजता ‘स्वीट अॅण्ड शॉर्ट’, ‘रौंदळ’, ‘जुनं फर्निचर’. दुपारी 1 वाजता ‘मदार’, ‘पावनखिंड’ आणि ‘कारखानीसांची वारी’. दुपारी 3 वाजता ‘वाळवी’, ‘जग्गू आणि ज्युलिएट’, ‘वाय.’
  • सर्व चित्रपट विनामूल्य पाहता येतील. याकरिता ऑनलाइन नाव नोंदणी सुरू करण्यात आली असून कार्यक्रमस्थळी ऑफलाइन नाव नोंदणीदेखील सुरू आहे. याशिवाय विविध परिसंवाद होणार आहेत. संगीतकार कौशल इनामदार यांची कार्यशाळा, दिग्दर्शक हंसल मेहता यांची मुलाखतही होईल.