
राज्यात सर्व सत्ता आपल्याच हाती हवी या हट्टापायी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत. राज्यातील सर्व सत्ता केवळ तीन लोकच चालवत असून लुटारूंची रचना निर्माण केली आहे, असा आरोप कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.
भाजपाने मुस्लिम व्यक्तीला पंतप्रधान किंवा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करावे
काँग्रेसचे आजपर्यंत 89 अध्यक्ष झाले, त्यात सर्व जाती धर्माचे, महिला, पुरुष, आदिवासी, एससी, एसटी, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माचे नेते होते. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची अध्यक्ष पदाची मुदत संपलेली आहे. नरेंद्र मोदी हेसुद्धा 75 वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांना निवृत्तीचे वेध लागले असतील, रा.स्व. संघातून कोणाच्या नावाचे पाकीट येणार. त्यापेक्षा तुम्हीच एखाद्या मुस्लिम व्यक्तीला पंतप्रधान किंवा भाजपाचा अध्यक्ष करा. सरसंघचालक मोहन भागवत यांनाही विश्रांती द्यावी व त्यांच्या जागी आदिवासी वा दलित समाजाच्या व्यक्तीला सरसंघचालक पदी बसवावे, असे सपकाळ म्हणाले.