
तरुणांनो सोशल मीडियावरील अनोळखी गोड गोड मेसेजला बळी पडू नका. हा हनी टॅप असू शकतो. याचा धोका वेळीच ओळखा, असा सल्ला उच्च न्यायालयाने दिला आहे.
सध्या सोशल मीडियावर खोटी प्रोफाईल तयार केली जाते. सुंदर व आकर्षक पह्टो अपलोड केले जातात. गोड गोड मेसेज करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. अशा मेसेजला लाईक व कमेंट केल्यानंतर संवाद वाढवला जातो. भावनिक नाते वृद्धिंगत केले जाते. विश्वास संपादित केला जातो. सावज जाळ्यात अडकले की मग आक्षेपार्ह गोष्टी करवून घेतल्या जातात. या माध्यमातून गुप्त माहिती काढून घेतली जाते. या हनी टॅपच्या युक्त्यांपासून तरुणांनी व देशातील प्रत्येक नागरिकाने सावध रहायला हवे, असेही न्यायालयाने नमूद केले.
सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक करायला हवे
सोशल मीडियावर प्रलोभने दाखवून हनी ट्रॅपप्रमाणे सायबर गुन्हे घडतात. अशा घटना रोखण्यासाठी नागरिकांना जागरूक करण्याची जबाबदारी न्यायालयाची आहे. त्यामुळे अनोळखी प्रोफाईलवर कमेंट करू नका. हे धोकादायक ठरू शकते, असा इशारा न्यायालयाने दिला.
तरुणाला जाळ्यात अडकवला
तरुणाईत फ्रेंड रिक्वेस्ट सहज स्वीकारणे स्वाभाविक आहे. व्हॉट्सअप व फेसबुकवरील आरोपीचे दोन तरुणींशी झालेले संभाषण बघता त्याला हनी ट्रपमध्ये अडकवले गेले. अशा घटनांपासून अन्य तरुणांनी धडा घ्यायला हवा, असे न्यायालयाने नमूद केले.
एक संधी द्यायला हवी
आरोपी हा तरुण आहे. गुन्हा गंभीर असला तरी त्याला सुधारण्याची एक संधी द्यायला हवी. कारण जेलमध्ये राहिला तर त्याचा परिणाम त्याच्या भविष्यावर होऊ शकतो. याचा विचार करता या तरुणाला 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला जात आहे, असे न्या. मिलिंद जाधव यांनी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण…
गौरव पाटील, असे या तरुणाचे नाव आहे. त्याने जळगाव येथील आयटीआयमधून मॅकेनिकल डिझेलचा कोर्स केला आहे. नेवल डॉकमध्ये अॅप्रेंटिसशिप करत असताना सोशल मीडियावरील पाकिस्तानी हनी ट्रपमध्ये तो अडकला. येथील गुप्त माहिती पाकिस्तानी हेरांना दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. डिसेंबर-2023मध्ये त्याला अटक झाली. तेव्हापासून तो कारागृहात आहे. यात जामीन मिळावा यासाठी पाटीलने याचिका केली होती.