
रहिवाशांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय जोरजबरदस्तीने एल्फिन्स्टन पूल पाडण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा, असा इशारा शिवसेनेच्या वतीने मंगळवारी एमएमआरडीएला देण्यात आला. शिवसेनेच्या वतीने परळ नाका आणि शिवडी नाका येथे स्थानिक रहिवाशांच्या सहभागाने एल्फिन्स्टन पुलाच्या तोडकामाच्या विरोधात साखळी उपोषण करत सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या सह्यांच्या मोहिमेचे निवेदन एमएमआरडीए आयुक्त, महापालिका आयुक्त आणि वाहतूक विभागाचे अधिकारी व संबंधित खात्याचे मंत्री यांना देण्यात येणार आहे.
शिवडी विधानसभेचे शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक रहिवाशी, रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या समस्या मांडत सरकार आणि एमएमआरडीए विरोधात घोषणा दिल्या. सरकारने जोरजबरदस्तीने पोलिसी बळ लावून हा पूल पाडण्याचा प्रयत्न केला. तर बुलडोझर किंवा व्रेनच्या समोर स्वतःला झोकून देण्याचा निर्धार रहिवाशांनी केला. या पुलामुळे 446 कुटुंबे बाधित होणार आहेत. एमएमआरडीए आयुक्तांनी अनेक वेळा आश्वासन देऊनही या कुटुंबाच्या पुनर्विकासाचा प्रश्न आजतागायत सुटलेला नाही. म्हणूनच 446 रहिवाशांचे आधी पुनर्वसन करा, मध्य रेल्वेवरील पादचारी पूल पूर्ण करा. शिवडी ते परळ नाकापर्यंत पुलाचे पिलर आणि गर्डरचे काम पूर्ण करा. मगच एल्फिन्स्टन पूल तोडायला घ्या, अशी मागणी आमदार अजय चौधरी यांनी केली. या आंदोलनात शिवडी विधानसभेतील सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक महिला आघाडी यांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला.
वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे करा
एल्फिन्स्टन पूल तुटल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. मग या वाहतुकीचे नियोजन कशा प्रकारे केले जाईल हेसुद्धा जनतेला कळणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडच्या दुतर्फा राहणाऱया रहिवाशांसाठी रस्ता ओलांडण्यासाठी वाहतूक वॉर्डन उभे करावेत जेणेकरून अपघात होणार नाहीत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
रुग्णाचे बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण?
केईएम, टाटा, ग्लोबल, महात्मा गांधी, वाडिया, बच्चुबाई या हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो लोक येतात. हा पूल तुटल्यानंतर टिळक ब्रिज आणि करी रोड पुलावरून रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याचे बरेवाईट झाले तर सरकार जबाबदारी घेणार आहे का, असा प्रश्न अनेकांनी या आंदोलनात उपस्थित केला. अशा रुग्णांसाठी रुग्णवाहिका प्रभादेवी स्थानकावरील पादचारी पुलाजवळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार अजय चौधरी यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांकडे लावून धरली.