दादर, माटुंगा, गिरगावमधील महापालिका वॉर्डवर धडक हंडा मोर्चा, पाणीटंचाईविरोधात शिवसेना आक्रमक

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील विविध भागांत गेल्या दीड महिन्यांपासून होणाऱ्या अपुऱ्या आणि गढूळ पाणीपुरवठय़ाविरोधात शिवसेनेने आज मुंबई महापालिकेच्या दादर, माटुंगा आणि गिरगावमधील जी-उत्तर, एफ-उत्तर आणि सी या महापालिका कार्यालयांवर हंडा मोर्चा काढत हल्लाबोल केला. जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही, मुंबईकरांच्या पाण्यासाठी लढू, प्रशासनाला जाब विचारू, अशा घोषणा देत पुढे सरकणाऱ्या मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी शेकडो शिवसैनिकांना ताब्यात घेतले. दरम्यान, आंदोलनानंतर मुंबईकरांची पाणी समस्या तातडीने सोडवा अशा मागण्यांचे निवेदन विभागप्रमुखांनी वॉर्ड ऑफिसरला दिले.

माटुंग्यात शिवसैनिकांचे ठिय्या आंदोलन 

विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माटुंगा येथील एफ-उत्तर कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला सुरुवात होताच पालिका कार्यालयाकडे कूच करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, वॉर्ड ऑफिसरला आम्ही फक्त निवेदन देऊ, हवे तर आमच्याबरोबर निवेदन देताना पोलीसही पाठवा, असे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करत रस्त्यावर बसत जोरदार ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे, शाखाप्रमुख विनोद मोरे, विधानसभा सहसंघटक प्रशांत भिसे, विधानसभा संघटक गजानन पाटील, आनंद जाधव, विधानसभा प्रमुख प्रणिता वाघमारे, उपविभागप्रमुख दत्ता भोसले, राजेश कुचिक, प्रभाकर भोगले, निरीक्षक शिवाजी गावडे, विनायक तांडेल, माजी नगरसेविका स्मिता गावकर, निधी शिंदे, माजी नगरसेवक रामदास कांबळे, शाखाप्रमुख संजय म्हात्रे, संजय कदम, सचिन खेडेकर, प्रकाश हसबे, प्रशांत जाधव, समाधान जुगधर, नितीन पाटोळे, विधानसभा संघटक सुहासिनी ठाकूर आंदोलनात सहभागी झाले होते.

पोलिसांना केले निरुत्तर

‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणा देत पुढे निघालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या वेळी शिवसैनिक आणि पोलिसांची शाब्दिक बाचाबाची झाली. आम्हाला का रोखता, आमच्याकडे गढूळ पाण्याची समस्या आहे.  शांततामय मोर्चाला रोखणारे तुम्ही कोण, आम्ही कायदा-सुव्यवस्था भंग केली आहे का, आमच्या हक्काचे पाणी तुम्ही आम्हाला देणार आहात का, असा थेट सवाल शिवसैनिकांनी विचारल्यावर पोलीसही निरुत्तर झाले.

गिरगावातही शिवसैनिकांनी विचारला जाब

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्यावतीने विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकाच्या सी वॉर्ड कार्यालयावर मोर्चा काढून महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यात आला. मोर्चाला सुरुवात होताच पोलिसांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले. आंदोलनात शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, अरुण दुधवडकर, महिला विभाग संघटिका युगंधरा साळेकर, उपविभागप्रमुख संपत ठाकूर, शाखाप्रमुख वैभव मयेकर, संतोष घरत, राजेश हजारे, शशिकांत पवार, दिलीप सावंत, महिला उपविभाग संघटिका सरिता तांबट, युवासेना युवती अधिकारी पायल ठाकूर यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.

परळमध्ये आज धडक हंडा मोर्चा

शिवसेना शिवडी विधानसभेच्या वतीने पाणीटंचाईकडे मुंबई महापालिका आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार, 16 एप्रिलला दुपारी 3 वाजता एफ-दक्षिण विभागावर धडक हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा कामगार मैदान येथून सुरू आहे, अशी माहिती आमदार अजय चौधरी यांनी दिली.

दादर, माहीम, धारावीतील पाणी समस्या सोडवा; वॉर्ड ऑफिसरला दिले निवेदन

शिवसेना विभागप्रमुख आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवन ते महापालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. मोर्चाला सुरुवात होताच बॅरिकेड्स लावून रोड बंद करत पोलिसांनी शिवसेना भवनाबाहेरूनच शिवसैनिकांना ताब्यात घेतले. दरम्यान, आंदोलनानंतर विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जी-उत्तरचे वॉर्ड ऑफिसर विनायक विसपुते यांना निवेदन दिले. या वेळी शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य, सचिव साईनाथ दुर्गे, विभाग संघटिका श्रद्धा जाधव, विभाग संघटक शशी पडते, निरीक्षक यशवंत विचले, उपविभागप्रमुख अभय तामोरे, सिद्धार्थ जाधव, पैलाश पाटील, विधानसभा संघटिका आरती किनारे, माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर, प्रीती पाटणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.