
महागाईच्या काळात चांगल्या पगाराची नोकरी असायला हवी, बँकेत पैशांची बऱ्यापैकी बचत असायला हवी, असे अनेकांना वाटते. त्यासाठी अनेकजण पै-पै जोडून, बचत करून बँकेत पैसा जमवतात. ज्यांच्याकडे नोकरी अन् पैसा नाही अशा लोकांना चिंता सतावत असते, परंतु एका 42 वर्षांच्या व्यक्तीकडे तब्बल अडीच कोटी रुपये बँकेत पडून आहेत. चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा आहे. तरीही हा व्यक्ती चिंताग्रस्त आहे.
सध्या मी चिंताग्रस्त आहे, अशी पोस्ट या व्यक्तीने रेडीटवर लिहिली आहे. मी 9 ते 5 या वेळेतील नोकरी करून आता थकलो आहे. मी आतून खूप खचलो आहे. मी नेहमी तणावग्रस्त राहतो. मी आता कामाच्या डेडलाइनसंबंधी विचार करतोय. आरोग्याच्या समस्यासुद्धा येत आहेत. टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये काम करावेसे वाटत नाही. मी जी नोकरी करतो ती सहजासहजी लवकर मिळत नाही. त्यामुळे नोकरी सोडू शकत नाही, परंतु नोकरी करताना कंटाळा आला आहे. काय करावे हे सुचत नाही, अशी पोस्ट या व्यक्तीने लिहिली आहे.
अडीच कोटींची एफडी
माझे वय सध्या 42 वर्षे आहे. आई-वडील दोघेही नाहीत. त्यांचे आधीच निधन झालेय. लग्न झाले नाही. त्यामुळे बायको आणि मुले नाहीत. भविष्यात लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. माझी एकूण संपत्ती 2.5 कोटी (एफडी) आहे. माझ्यावर कोणतीही आर्थिक जबाबदारी नाही. घराच्या कर्जाचा ईएमआय नाही. 62 वर्षे पूर्ण होताच मला दर महिन्याला 84 हजार रुपये मिळतील, परंतु तरीही मी आनंदी नाही. सतत तणावग्रस्त असतो, असे या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.