युद्धात शत्रूंच्या नजरेतून वाचविण्यासाठी सैनिकांसाठी बनवला खास सूट, युक्रेनी महिलांची अनोखी लढाई

युरोपच्या हृदयात अजूनही एक रक्तरंजित संघर्ष सुरू आहे आणि त्यात महिलांनी फक्त सहानुभूती नव्हे, तर शक्तीचे उदाहरण बनवले आहे.

महिला कोणतीही जबाबदारी घेण्यासाठी तत्पर असतात. मग ते क्षेत्र कोणतेही असो. महिला केवळ जबाबदारी घेत नाहीत, तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र झटतात. युक्रेनच्या बुचा जिल्ह्यातील होरेनका या गावातील महिलांनीसुद्धा युद्धात सहभाग घेत एक अनोखी लढाऊ सुरू केलीय. येथील महिलांना युद्धात लढण्यासाठी जाणाऱ्या सैनिकांसाठी खास ‘किकीमोरा सूट’ बनवला आहे. या सूटचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा सूट सैनिकांना शत्रूंच्या नजरेतून वाचविण्याचे काम करतो. युद्धात पुरुष आघाडीवर असून महिलांनी नवीन जबाबदाऱया स्वीकारल्या आहेत. त्यामुळे आता युक्रेनी महिलांनी इतिहासात आपली जागा निर्माण केली आहे. त्या फक्त युद्धाच्या पीडिता नाहीत, तर बदलाच्या नेत्या ठरत आहेत. या महिला दररोज एकत्र येऊन सैनिकांसाठी हे खास ‘कॅमोफ्लाज सूट’ तयार करतात. या महिलांनी आता एक कुटुंब तयार केले आहे. या महिलांनी तयार केलेला सूट त्याच्यासाठी कवच आहे. युक्रेनमध्ये आता हे सूट तयार करणे एक जनआंदोलन बनले आहे. शाळा, संग्रहालय, मेट्रो स्टेशन सर्वत्र महिलांनी एकत्र येऊन सूट विणण्याचे काम सुरू केले आहे. एक सूट चार महिला एकत्र मिळून सहा तासांत तयार करतात.

तरुणींपासून आजीबाईंचा समावेश

या गावात 60 महिलांमध्ये एक नवी ऊर्जा आणि नवीन शक्ती तयार झाली आहे. यात तरुणींपासून 80 ते 90 वयाच्या आजीबाईंचासुद्धा समावेश आहे. सगळ्या जणी आपापल्या परीने यात सहभागी होतात. कोणाच्या डोळ्यात आपल्या मुलाच्या परतण्याची आशा आहे, तर कोण आपल्या घराच्या शोधात आहे. काही फक्त शत्रू परतू नये म्हणून सूट विणतात. हे सूट घातल्यानंतर शत्रूला युक्रेनचे सैनिक ओळखणे अवघड जाते.