विरोधी पक्षाच्या नेत्यांना पुन्हा ED च्या नोटीसा यायला लागल्या म्हणजे…! संजय राऊत यांचं सूचक विधान

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांची आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांना पुन्हा ईडीच्या नोटीसा येत आहेत, यावर संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

नाशिकमध्ये उद्या शिबिर होत आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. वातावरण निर्मिती किंवा पूर्वतयारी म्हणून आज संध्याकाळी नाशिक शहरातून मशाल, भगवे झेंडे घेऊन शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) बाईक रॅली निघणार आहे. आणि उद्या सकाळी 9.30 वाजता शिबिराला सुरुवात होईल. आदित्य ठाकरे आज रात्रीच येत आहेत. आणि उद्धव ठाकरे हे उद्या दुपारपर्यंत पोहोचतील. पक्षातील प्रमुख वक्ते, पदाधिकारी यांची संध्याकाळी यायला सुरुवात होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.

“निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या दाव्याची चौकशी होणं गरजेचं”

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्या प्रकरणात अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडबाबत निलंबित पोलीस अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी 50 कोटीची ऑफर दिल्याचे त्याने म्हटले आहे. या प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी चौकशीची मागणी केली. निलंबित पोलीस अधिकारी कासले यांचं असंही म्हणणं आहे की, त्यांनी पोलीस डायरीमध्ये नोंद केलेली आहे. आपल्याला वाल्मिक कराडचं एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या, हे कासले यांनी डायरीत लिहिलं आहे. हे फेक एन्काउंटर्स या महाराष्ट्रात आणि देशात अलिकडच्या काळात घडलेले आहेत, त्याला दुजोरा देणारं हे विधान आहे. ही याची चौकशी होणं गरजेचं आहे. जर हे निलंबित अधिकारी सांगत असेल की, मी अशा प्रकारची नोंद पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर ते अधिक गंभीर आहे. ही नोदं झाली तेव्हाच कारवाई का झाली नाही? वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असा प्लॅन दिसतोय. असं कोण यामागे होतं हे लोकांसमोर यायल्या पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

“कृत्रिम पाणीटंचाई करण्यामागे काहीतरी डाव”

मुंबईत आम्ही विभागवार आंदोलनं सुरू केली आहेत. आणि महापालिकेच्या कार्यालयावर हंडे मोर्चे जाणार आहेत. देशाच्या राजधानीत पाण्याची तीव्र टंचाई आहे, टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय. मुंबईमध्ये आतापर्यंत ही वेळ कधी आली नव्हती. कारण निर्णय घ्यायला महापालिका अस्तित्वात नाही. साडेतीन वर्षांपासून 14 महापालिका त्यात नाशिकही आहे, अस्तित्वात नाही. हे सर्व प्रश्न महापालिकेच्या माध्यमातून सोडवायचे असतात. नियोजन नाही, शिस्त नाही आणि भ्रष्ट महापालिका अधिकाऱ्यांच्या हातामध्ये 14 महापालिकांचा कारभार आहे. आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून महापालिकानी आणि शहरांची प्रचंड लूट सुरू आहे. नागरी सुविधांच्या नावाने बोबं आहे, त्यात पाण्याचा प्रश्न आहे. काही तरी यामध्ये डाव दिसतोय. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करायची. आणि राज्यभरात टँकर माफियांना मदत करायची आणि पाणीवाटपही आपल्या आपल्या लोकांना ठेकेदारी पद्धतीने द्यायचं ही अत्यंत गंभीर समस्या आहे. त्यामुळे शिवसेनेनं मुंबईतून हा पाण्याचा आक्रोश मोर्चा सुरू केलेला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केली.

“मतदार यादीत घोटाळे करून जिंकून आलेल्या माणसांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवू नये”

चंद्रकांतदादा, तुम्ही कसे जिंकून आलेला आहात, ही मोदींची बहीण तुळशीबाई गबार्ड, कमळाबाईने तुळशीबाईंशी चर्चा करावी. मोदी कसे जिंकून आलेत, ते त्यांनी परवा सांगितलं. ईव्हीएम हॅक करून, ईव्हीएम हायजॅक करून आणि ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवून अशा पद्धतीने जिंकून आलेत. त्यांना कोणीही मतदान केलेलं नाही. चंद्रकांत पाटील यांना तर अजिबात नाही. मतदार यादीत घोटाळे करून जिंकून आलेल्या माणसांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

रॉबर्ट वाड्रा, सोनिया गांधी, राहुल गांधी असतील किंवा आम्ही विरोधी पक्षातले सगळे लोक असू दे, आम्हालाच सगळ्या नोटीसा येतात. याचा अर्थ भाजपच्या पायाखालची वाळू पुन्हा सरकारला लागली आहे. पुन्हा एकदा यांची हवा टाईट झाली आहे, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.