नवीन योजनेतून पाणी मिळण्यास 2026 उजाडणार

राज्य शासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. ३१ मार्चची डेडलाईन हुकल्यानंतर आता जूनची नवी तारीख दिली जात आहे. पण प्रत्यक्षात शहरात पाणी येण्यासाठी २०२६ उजाडणार आहे. नाथसागरातील जॅकवेलचे (उद्भव विहीर) शंभर टक्के काम पूर्ण होण्यासाठी बारा महिने लागणार आहेत. मुख्य पाइपलाइनचे काम अंतिम टप्प्यात असले तरी हायड्रॉलिक चाचणीसाठी तीन ते चार महिन्यांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे शहरासाठी २०२६ चा उन्हाळा देखील त्रासदायक ठरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शहराचा पाणीप्रश्न २० ते २५ वर्षांपासून गंभीर वळणावर आहे. महापालिकेच्या लेखी एक-दोन दिवस त्यानंतर पुढे तीन दिवसाआड पाणी देण्याचे वेळापत्रक असले तरी सध्या शहरात १० ते १२ दिवसांनंतर नळाला पाणी मिळत आहे. शहराच्या काही भागात तीन-चार तास नळाला पाणी येते, तर नवीन शहरात म्हणजेच सिडको, हडकोला केवळ पाऊण तास पाणी सोडले जाते. त्यात नळाला मोटार लावूनही एक हजार लिटर पाणी मिळणे अवघड आहे. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत.

विशेष म्हणजे पाइपलाइन फुटण्याच्या व तांत्रिक बिघाडाच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यात नवीन पाणी योजना केव्हा सुरू होईल आणि तहानलेल्या शहरवासीयांना मुबलक पाणी कधी मिळेल, याची प्रत्येकाला आस लागली आहे. पाणी योजनेचे काम करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ३१ मार्चला पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी शहरात आणू, असे जाहीर केले होते. त्यासोबत पालकमंत्री संजय शिरसाट, सत्ताधारी नेते वारंवार डेडलाईन जाहीर करत आहेत. आता ३० एप्रिलची नवी डेडलाईन देण्यात आली आहे. दरम्यान, शहराच्या पाणीटंचाईच्या अनुषंगाने महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी रविवारी सध्या सुरू असलेली कामे, त्यातील अडचणी यांची बारकाव्याने तपासणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नवी पाणीपुरवठा योजनेचे शहराला प्रत्यक्षात पाणी मिळण्यासाठी २०२६ उजाडण्याची शक्यता आहे. पाणी योजना कार्यान्वित होण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे काम जॅकवेलचे असून, जॅकवेलच्या सध्याच्या कामाची गती पाहता मार्च २०२६ पर्यंत हे काम चालणार आहे. सध्या ६० टक्केच मजूर याठिकाणी काम करत आहेत. पाइपलाइनची हायड्रॉलिक चाचणी बंधनकारक आहे. ही चाचणी पूर्ण करण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे मे २०२६ मध्ये शहराला प्रत्यक्षात पाणी मिळू शकते, असे कंत्राटदाराच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.