कोट्यवधी खर्चुन महागडे फ्लॅट घेतले पण.. घोडबंदरवासीयांच्या तोंडचे ‘पाणी’ पळाले, दररोज 25 हून अधिक टँकरने पाणीपुरवठा

कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट खरेदी करूनदेखील घरात पाण्याचा टिपूसही येत नसल्याने ऐन उन्हाळ्यात घोडबंदरवासीयांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे. शहरात ठाणे महापालिका आणि खासगी टँकरमाफियांकडून पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ठाणे महापालिका हद्दीत दरदिवशी 25 हून अधिक पिण्याच्या टँकरची आवश्यकता भासत आहे. दरम्यान, प्रतिमहिना 750 टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने पाणीटंचाईने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षांत झपाट्याने नागरीकरण होत आहे. शहराची लोकसंख्या जवळपास 27 लाखांच्या घरात गेली आहे. संपूर्ण शहरात चार स्रोतांमार्फत दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी लोकसंख्येच्या मानाने तो अपुरा पडू लागला आहे. नव्याने विकसित झालेल्या घोडबंदर भागातील इमारतींमधील रहिवाशांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. घोडबंदर भागातील कावेसर, मानपाडा, कासारवडवली, वाघबीळ, ओवळा, मोघरपाडा, आनंदनगरसह कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील काही भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

वाढीव पाण्यासाठी प्रयत्न सुरू
नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागात सात लाखांच्या वर लोकसंख्या गेली आहे. एकट्या घोडबंदर येथे प्रतिदिन 110 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे, परंतु आता हाच पुरवठा अपुरा पडत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने या भागाला वाढीव पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

चार स्रोतांमार्फत पुरवठा
ठाणे पालिका क्षेत्रात चार स्रोतांमार्फत दररोज पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यात पालिकेच्या स्वतःच्या योजनेतून 250 दशलक्ष लिटर, स्टेम प्राधिकरणाकडून 115 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.