
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या करणाऱ्या नराधम विशाल गवळीने रविवारी पहाटे तळोजा कारागृहात आत्महत्या केली. या घटनेनंतर विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर सोमवारी मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात बलात्कारी विशाल गवळीवर विठ्ठलवाडी स्मशानभूमीत मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात आले.
कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात 23 डिसेंबर 2024 रोजी नराधम विशाल गवळीने एका 13 वर्षीय चिमुकलीचे अपहरण केले होते. तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केल्यानंतर निघृण हत्या केली. या हत्याकांडात त्याची पत्नी साक्षीचाही सहभाग होता. पोलिसांनी शेगावमधून अटक केल्यानंतर गवळीला तळोजा जेलमध्ये ठेवले होते. मात्र रविवारी पहाटे त्याने जेलमध्येच आत्महत्या केली.
स्मशानभूमीबाहेर पोलीस छावणी
बदलापूरमध्ये एका शाळेतील बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी परिसरात तीव्र विरोध निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर विशाल गवळीचा मृतदेह जे. जे. रुग्णालयातून कल्याणमध्ये आणताना पोलिसांनी गुप्तता पाळली होती. नागरिकांचा विरोध होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सोमवारी मध्यरात्री विशालचा मृतदेह विठ्ठलवाडी स्मशानभूमीत आणण्यात आला. गवळीवर अंत्यसंस्कार होईपर्यंत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.