सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार? काँग्रेसचा सवाल

संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरूंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रिपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार, असा  सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत हास्यास्पद आहे. काँग्रेस पक्षाने देशासाठी दिलेले योगदान अधोरेखित झालेले आहे, काँग्रेसला जाज्वल्य इतिहास आहे, हे मोदीच काय कोणीही नाकारू शकत नाही. काँग्रेस सरकारच्या काळात साक्षरतेपासून अंतराळापर्यंत प्रगती केलेली आहे.मोदी हे 11 वर्षांपासून सत्तेत आहेत. या 11 वर्षांत त्यांनी देशाचे काय भले केले, हे त्यांनी जाहीर करावे. नरेंद्र मोदी यांनी हिंदू-मुस्लिम, दलित-सवर्ण-ओबीसी यांच्यात द्वेष निर्माण करण्याचेच काम केले आहे. तीन तलाक, वक्फ बोर्डसारखे मुद्दे उपस्थित करून मोदींनी मुस्लिम महिलांबद्दलची आपली खोटी तळमळ दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मोदींनी गेल्या 11 वर्षांत एकाही मुस्लिम महिलेला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री केले नाही. मोदींनी गेल्या 11 वर्षांत एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात मुस्लिम आणि दलितांवर अत्याचार वाढले आहेत. त्यांचे लिंचिंग रोखण्यासाठी मोदींनी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांच्या कोरड्या भाषणबाजीला काही अर्थ नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला किती प्रेम आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. याच विचाराच्या लोकांनी बाबासाहेबांचा सातत्याने अपमान केला. संविधानाला रा. स्व. संघ पहिल्यापासूनच मानत नाही. रामलीला मैदानावर संविधान कोणी जाळले, हे मोदींना माहीत नाही का? परंतु खोटा इतिहास सांगून दिशाभूल करणे ही संघाची शिकवण आहे, तेच मोदी करत आहेत, असेही सपकाळ म्हणाले.