नितीन गडकरींची नवीन ‘गॅरंटी’, मुंबई-गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होणार

mumbai goa highway

गेली कित्येक वर्षे खड्डय़ांचा मार सोसत मुंबई-गोवा महामार्गावरून कोकण गाठणाऱया चाकरमान्यांना पेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नवीन ‘गॅरंटी’ दिली. मुंबई-गोवा महामार्गासाठी खूप अडचणी आल्या. पण काळजी करू नका. यंदाच्या जूनपर्यंत हा रस्ता 100 टक्के पूर्ण करणार, असा शब्द गडकरी यांनी मुंबईत बोलताना दिला.

दादर येथील अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्येनमालेत गडकरी बोलत होते. दिल्ली-जयपूर आणि मुंबई-गोवा आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉटस् आहेत. त्यांच्या अडचणी खूप आहेत. कोकणातील सत्य गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला चालणार नाहीत. भावा-भावांमध्ये भांडणे, न्यायालयांत केसेस झाल्या. त्या जमिनींचा मोबदला देता देता पुरेवाट लागली, पण आता त्या समस्या सुटल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. जूनपर्यंत महामार्गांचे काम 100 टक्के पूर्ण होईल, असे गडकरी म्हणाले.

टोलनाके राहणार नाहीत

देशभरात यापुढे टोलनाके राहणार नाहीत. त्याचदृष्टीने पेंद्र सरकार लवकरच नवीन टोल धोरण आणणार, असेही पेंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्याख्यानमालेत बोलताना जाहीर केले. टोलबाबत मी आता जास्त काही सांगणार नाही; पण तुम्हाला पुढच्या 15 दिवसांच्या आत टोलबाबत नवीन धोरण दिसेल. त्या धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुमची टोलबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही. मी केवळ महाराष्ट्रातील टोलनाक्यांबाबत बोलत नाहीय, तर सर्वच राष्ट्रीय महामार्गांबाबत बोलतोय, असे ते म्हणाले.

हिंदुस्थानातील ‘रोड इन्फ्रा’ अमेरिकेपेक्षा उत्तम असेल

देशात टोलनाके नसतील; परंतु सॅटेलाईट सिस्टमद्वारे तुम्ही तेथून निघाल्यानंतर तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून तुमच्या बँक खात्यातील पैसे कपात होतील. पुढील दोन वर्षांमध्ये आपल्या देशातील ‘रोड इन्फ्रा’ अमेरिकेपेक्षा उत्तम असेल, असे गडकरी यांनी सांगितले.