चोक्सीला बेल्जियममधून अटक, हिंदुस्थानकडून प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) तब्बल 13 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर पळून गेलेला कर्जबुडव्या मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. पीएनबी घोटाळा 2018 मध्ये उघडकीस आला होता. तब्बल सात वर्षांनंतर चोक्सीला अटक करण्यात आली असून, त्याच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थानकडून प्रयत्न सुरू आहेत.

हिंदुस्थानातून फरार झाल्यानंतर मेहुल चोक्सीने अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व घेतले आहे. प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी तो बेल्जियमला आला होता. त्याची पत्नी प्रीती चोक्सीही सोबत आहे. बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये ते राहत होते. ही माहिती सीबीआयला मिळताच बेल्जियम पोलिसांशी संपर्क साधला. शनिवारीच चोक्सीला अटक केल्याचे वृत्त आहे. बेल्जियम पोलिसांनी अटक केल्यानंतर चोक्सीने प्रकृती आणखी बिघडल्याचे कारण देत तेथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्याचे वृत्त आहे. चोक्सी हा अँटिग्वा आणि बारबुडाचा नागरिक आहे. बेल्जियममध्ये उपचारासाठी आला होता, असे त्याच्या वकिलांनी म्हटले आहे.

घोटाळा उघड करणारे हरिप्रसाद म्हणतात प्रत्यार्पण अवघड

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा हरिप्रसाद एसव्ही यांनी उघडकीस आणला होता. हरिप्रसाद यांनी चोक्सीच्या प्रत्यार्पणाबाबत शंका व्यक्त केली आहे. यापूर्वी डॉमिनिका येथे चोक्सीला अटक झाली होती. पण कायदेशीर प्रक्रियेतून तो निसटला होता. त्याचे प्रत्यार्पण सोपे नाही. चोक्सीचा खिसा भरलेला आहे. विजय मल्ल्याप्रमाणे चोक्सीदेखील प्रत्यार्पण टाळण्यासाठी युरोपातील चांगले वकील नेमू शकतो. त्यामुळे त्याचे प्रत्यार्पण अवघड आहे, असे हरिप्रसाद यांनी सांगितले.

निरव मोदी ब्रिटनच्या तुरुंगात

या घोटाळ्यातील दुसरा ठग निरव मोदी सध्या लंडनमध्ये असून, वेस्टमिन्स्टर तुरुंगात असल्याची माहिती आहे. गेल्यावर्षी वेस्टमिन्स्टर न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मोदीने पीएनबीची 6 हजार 450 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआय, ईडीने त्याला फरार घोषित केले आहे. त्याच्या 692 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे.

पासपोर्ट रद्द

या घोटाळ्याचा तपास सीबीआय आणि ईडीने केला. चोक्सी आणि मोदीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची संपत्ती जप्त केली. त्यांचे पासपोर्टही रद्द केले आहेत.

काय आहेत आरोप

  • 2018 मध्ये पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार 500 कोटींचा घोटाळा उघडकीस आला. यात मुख्य आरोपी मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा निरव मोदी असल्याचे स्पष्ट झाले.
    चोक्सी आणि मोदी हे हिरे व्यापारी आहेत. या दोघांनी बँक अधिकाऱयांना हाताशी धरून त्यांच्या मालकीच्या पंपन्यांना लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) फॉरेन लेटर्स आणि व्रेडिट मिळवल्याचा आरोप आहे.
  • चोक्सी आणि मोदीने पीएनबी बँकेकडून तब्बल 13 हजार 500 कोटींचे कर्ज घेतले. कर्ज बुडवून ते दोघे देशाबाहेर पळून गेले.