
मुंबईच्या अनेक भागातील पाणीटंचाई आणि दूषित-गढूळ पाणीपुरवठय़ाबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही पालिका कोणतीही कार्यवाही करीत नसल्यामुळे प्रशासनाविरोधात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. ढिम्म प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार उद्या, 15 एप्रिलपासून शिवसेनेचा महापालिका कार्यालयांवर ‘हंडा मोर्चा’ धडकणार आहे. मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ‘पाणीबाणी’चा यावेळी निषेधही करण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये शिवसैनिक, महिलांसह हजारो रहिवासी सहभागी होणार आहेत.
मुंबईमध्ये पाच दिवस चाललेल्या टँकरचा बंद आणि पालिकेच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. याबाबत प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये पाठपुरावा केला असतानादेखील प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली. त्यामुळे सरकार आणि पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश करीत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानुसार उद्यापासून वॉर्ड ऑफिसवर आंदोलन सुरू होत आहे. यामध्ये उद्यापासून शीव कोळीवाडा, चेंबूर आणि अणुशक्तीनगरमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिली.
या अटींना विरोध
- केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमानुसार, मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने मुंबईतील विहिरी आणि बोअरवेल मालकांना पालिकेची एनओसी घेणे बंधनकारक केले आहे.
- मात्र ‘एनओसी’ मिळवण्यासाठी विहिरीभोवतीची 2 हजार फुटांची जागा मोकळी सोडावी, पाणी भरताना टँकर्स सोसायटी किंवा चाळीजवळ उभे करू नयेत. पाण्याचे पूर्ण वर्षांचे पैसे आगाऊ भरावेत.
- टँकर्सवर मीटर बसवावेत, रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे यासह इतर अटी आहेत, मात्र यातील पहिल्या दोन अटी शिथिल करा, अशी मागणी टँकर्स चालकांनी केली आहे.
असे झाले मुंबईकरांचे हाल
वॉटर टँकरचालकांच्या संपामुळे व्यावसायिक, बांधकाम प्रकल्प, हॉटेल आणि अनेक आस्थापनांमधील पाणीपुरवठा ठप्प झाल्याने मोठे नुकसान होऊन कामे ठप्प झाली. शिवाय शेकडो सोसायट्यांमध्येही वॉटर टँकर आला नसल्याने रहिवाशांचे हाल झाले. दुपारनंतर संप मागे घेण्यात आल्याने पाचव्या दिवशीदेखील रहिवाशांना मनस्ताप झाला.
असे होणार आंदोलन
15 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजता. स्थळ – शीव कोळीवाडा, एफ/नॉर्थ पालिका कार्यालय
16 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजता. स्थळ – चेंबूर, एम/पश्चिम पालिका कार्यालय.
17 एप्रिल रोजी दुपारी दुपारी 3.30 वाजता, स्थळ – अणुशक्तीनगर, एम/पूर्व बीएमसी कार्यालय.
अखेर वॉटर टँकर्सचा संप मागे
मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला टँकर्सचालकांचा संप मुंबई वॉटर टँकर्स असोसिएशनने आज पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेतला. दरम्यान, संप मागे घेतला असला तरी नियम शिथिल करून एनओसी द्यावी या मागणीसाठी कोर्टासह राज्य आणि केंद्राकडे पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे, अशी माहिती मुंबई वॉटर टँकर्स असोसिएशनचे सचिव राजेश ठाकूर यांनी दिली.
मुंबईकरांना यातना का दिल्या?
मोर्चाचा इशारा देताच सरकारने मध्यस्थी केली. महापालिका आयुक्तांनी कारवाई न करण्याचे निर्देश दिल्यामुळे टँकर्सचालकांनी संप मागे घेतला. मात्र, ज्या वेळी टँकर्सचालकांनी पालिकेला संपाची नोटीस दिली त्याचवेळी बोलणी करून संप टाळता आला असता. मात्र, महापालिकेने तसे न करता मुंबईचा पाणीप्रश्न चिघळवला आणि त्यात मुंबईकर होरपळले. पालिकेने मुंबईकरांना यातना का दिल्या, असा सवालही त्यांनी केला.