
तरुणीचा एकदा पाठलाग करणे म्हणजे छेडछाड होत नाही. ही कृती वारंवार घडली तरच तो आयपीसी कलम 354-ड अंतर्गत गुन्हा ठरतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
हा निर्वाळा देत नागपूर खंडपीठातील न्या. गोविंद सानप यांच्या एकल पीठाने एका तरुणाची छेडछाडीचा आरोपातून निर्दोष सुटका केली. हा तरुण वर्धा येथील आहे. तरुणीची छेड काढल्याच्या गुह्यासाठी अमरावती सत्र न्यायालयाने त्याला एक वर्षाची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात त्याने अपील याचिका केली होती.
जबाबात विरोधाभास
पीडितेची साक्ष व साक्षीदारांच्या जबाबात विरोधाभास आहे. आरोपी तरुणाने एकदाच पाठलाग केल्याचा उल्लेख आहे. एखादी कृती वारंवार घडली. संवाद वाढवण्यासाठी सतत प्रयत्न झाले तरच तो गुन्हा ठरू शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
गुन्हा नोंदवताना अनेकदा अतिशयोक्ती, कल्पना
गुन्हा नोंदवताना अनेकदा अतिशयोक्ती व कल्पनांचा समावेश केला जातो. गुन्हा नोंदवताना उशीर झाल्यास याची भीती अधिक असते. याप्रकरणात गुन्हा नोंदवायला उशीर झाला. पुराव्यांच्या विश्वासार्हतेवर संशय निर्माण झाला. याचा फायदा तरुणाला मिळाला, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
- या तरुणाचे एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. 23 जुलै 2018 रोजी ही घटना घडली. तरुणाने मुलीचा दोनदा हात पकडला. होकार दिला नाहीस तर आत्महत्या करेन, अशी धमकी देत मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिचा पाठलागही केला होता. याचा गुन्हा नोंदवण्यात आला. यासाठी दोषी धरत सत्र न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली.