कांदिवलीत अग्निशमन दलाच्या जवानांसाठी लवकरच आधुनिक प्रशिक्षण केंद्र, अतिरिक्त पालिका आयुक्तांची माहिती

आग लागलेल्या ठिकाणी तात्काळ पोहोचून आग शमवणे, बचावकार्य करणे यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आग शमवणे आणि स्वःरक्षणासाठी जवानांना आधुनिक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी कांदिवली येथे जवानांसाठी देशातील पहिले अद्ययावत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त अमित सैनी यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात सेवा बजावताना आजवर शहीद अग्निशमन अधिकारी आणि जवानांना ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ निमित्ताने भायखळा येथील मुंबई अग्निशमन दल मुख्यालयात आज आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी सैनी यांनी ही घोषणा केली. सुरुवातीला अग्निशमन मुख्यालय आवारातील वीर स्मृतिस्तंभाला मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच अग्निशमन दलाने मानवंदना दिली. मुंबईवर आलेल्या विविध संकटांना तोंड देताना प्राणांची आहुती देणारे अग्निशमन अधिकारी, जवान यांच्या बलिदानाची आठवण करून देणारी ध्वनिफीत यावेळी दाखवली. अग्निशमन सेवा सप्ताहाचा प्रारंभदेखील करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक, पालिकेचे उपायुक्त प्रशांत गायकवाड, मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर उपस्थित होते.

प्रशिक्षणाची आवश्यकता

आग शमवण्याच्या घटनांसह पावसाळय़ातील पूरस्थिती, इमारती कोसळणे अशा आपत्तींमध्ये बचाव कार्यासाठीदेखील जवानांना प्रशिक्षण दिले पाहिजे, असे मत महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी व्यक्त केले.

असे असेल प्रशिक्षण केंद्र

अग्निशमन केंद्राच्या प्रशासकीय कामासाठी तीन मजली इमारत बांधली जाणार आहे. एक लाख स्क्वेअर फूट जागेत या अग्निशमन केंद्राचे काम होणार आहे. या ठिकाणी जवानांना ट्रेनिंग देण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी केले होते भूमिपूजन

ट्रेनिंग सेंटर, बचाव यंत्रणा, कर्मचारी-अधिकारी निवासस्थान, जवानांसाठी अत्याधुनिक ट्रेनिंग सेंटर, बचाव यंत्रणा आणि कर्मचारी-अधिकाऱयांसाठी सर्व सुविधायुक्त निवासस्थान असलेले अद्ययावत अग्निशमन केंद्र कांदिवली पूर्वच्या ठाकूर व्हिलेज येथे होणार आहे. या अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी 2021 साली केले होते.