
ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र मोदी (75) यांनी आज त्यांचे आयुष्य संपवले. दक्षिण मुंबईतील राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या घरामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांनी त्यांच्या मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याचे नमूद केले आहे.
सुरेंद्र मोदी हे लोहार चाळ येथील मस्तकी महाल या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहत होते. अविवाहित असल्याने मोदी घरात एकटेच राहत होते. आज सकाळी सवासहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी पाचव्या मजल्यावरून खाली उडी टाकली. त्यात गंभीर जखमी होऊन मोदी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोदी यांच्या घरात चिठ्ठी सापडली असून चिठ्ठीतील हस्ताक्षर सुरेंद्र मोदी यांचे असल्याचे त्यांची पुतणी सोनल मोदी (65) यांनी ओळखून सांगितले आहे. सोनल या त्याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतात. मृत्यूबाबत कोणाकडूनही तक्रार किंवा शंका व्यक्त करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मोदी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. ते जन्मभूमी दैनिकात कार्यरत होते. क्राइम रिपोर्टर म्हणून मोदी यांनी यशस्वी पत्रकारिता केली. ते मुंबई क्राइम रिपोर्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील होते.