आधी पुनर्वसन करा; मगच एल्फिन्स्टन पूल तोडा, वरळी-शिवडी कनेक्टर प्रकल्पबाधितांची मागणी

गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून आम्ही इथे राहतोय. या चाळीसोबत आमच्या पिढ्यान् पिढ्यांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. वरळी-शिवडी कनेक्टरला आमचा विरोध नाही, पण या पुलासाठी आमचे संसार रस्त्यावर आणू नका. आधी आमचे योग्य पुनर्वसन करा, मगच एल्फिन्स्टन पुलाचे तोडकाम करा, अशी मागणी येथील प्रकल्पबाधितांनी केली आहे.

अटल सेतूवरून येणाऱया वाहनांना थेट वरळी आणि वांद्रय़ाच्या दिशेने प्रवास करणे सोपे व्हावे यासाठी सव्वाशे वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल तोडून डबलडेकर पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी लक्ष्मी निवास आणि हाजी नूर या इमारती बाधित होणार असून सुमारे 60 ते 70 रहिवाशी आणि काही दुकानदारांना फटका बसणार आहे.

यासंदर्भात लक्ष्मी निवास इमारतीमधील रहिवासी वीरुभाई गाडा म्हणाले, ‘गेल्या आठवडय़ात आमची एमएमआरडीएसोबत बैठक झाली. प्रकल्पबाधितांना आर्थिक मोबदला देण्याची त्यांनी तयारी दर्शवली. पुलाच्या कामाला आमचा विरोध नाही; पण प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाल्याशिवाय पुलाचे तोडकाम करू नका.’ काही रहिवाशांनी आम्हाला पैसे नको, घराच्या बदल्यात याच परिसरात घर द्या, अशी मागणी केली आहे.

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

एल्फिन्स्टन पुलाला लागून जिमी चेंबर, वारंग चाळ, समर्थ निवास, झवेरी बिल्डिंग 1 आणि 2, वाकानी हाऊस, शिवडीकर या शंभरहून अधिक वर्षे जुन्या इमारती आहेत. आमच्या इमारतीला लागून पुलाची उभारणी केली जात आहे. तरीही एमएमआरडीएने आम्हाला विश्वासात घेतले नाही. पुलाच्या कामामुळे आमच्या इमारतीच्या पिलरला तडे गेल्यास आणि भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल जिमी चेंबर इमारतीमधील रहिवाशी बहादूर जडेजा यांनी उपस्थित केला.

पालिका-एमएमआरडीएमध्ये समन्वयाचा अभाव

रोड लाइनमधील बांधकामे हटवण्याशिवाय हा चार पदरी पूल होणार नाही, असा पालिकेचा सर्व्हे रिपोर्ट आहे. त्यानुसार या पुलाच्या बांधकामासाठी या 19 इमारतींमधील 400 रहिवाशी विस्थापित होणार आहेत. रोड लाइनमधील बांधकामे आम्ही हटवू, पण रहिवाशांचे पुनर्वसन एमएमआरडीएने करावे अशी पालिकेची भूमिका आहे. पालिका आणि एमएमआरडीए यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने आम्हा रहिवाशांचे पुढे काय होणार हा प्रश्न अधांतरी आहे, असे श्री समर्थ निवास इमारतीमधील रहिवाशी श्रीराम पवार यांनी सांगितले.

पुलाच्या बांधकामासाठी आमच्या इमारती बाधित होणार आहेत की नाहीत याची स्पष्टता अद्याप आम्हाला दिलेली नाही. उद्या अचानक एमएमआरडीएने नोटीस बजावून आम्हाला घरे रिक्त करायला लावली तर आम्ही कुठे जाणार? आमच्या इमारती बाधित होणार नसतील तर एमएमआरडीएने आम्हाला तसे स्पष्ट लिहून द्यावे. तोपर्यंत विकासकही आमच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी तयार होणार नाहीत. – संदीप वारंग, वारंग चाळ

पुलाच्या बांधकामामुळे या रस्त्यावरील रहदारी पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे आमच्यासारख्या दुकानदारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. – किरण पुरिया, दुकानदार