
डोळ्यांत स्वप्ने मोठी असतील आणि संघर्षाची तयारी असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही. उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद जिह्यातील खेरे नगला गावातील आयुष राजपूत याचा प्रवासही असाच प्रेरणादायी आहे. शेतकऱ्याचा मुलगा असलेला आयुष्य त्यांच्या अतोनात मेहनतीतून ईडी अधिकारी बनला आहे. गावात सरकारी नोकरी मिळणारा पहिलाच तरुण बनला आहे. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीत आयुषचे बालपण गेले. दिवसभर वडिलांसोबत शेतात राबायचे आणि उरलेल्या वेळेत अभ्यास करायचा, हा त्याचा रोजचा दिनक्रम असे. तरीही त्याने परिस्थितीपुढे हार मानली नाही. आयुषने त्याचे शिक्षण एसडी इंटर कॉलेज पाहला येथून सुरू केले. त्यानंतर स्वराजवीर इंटर कॉलेजमध्ये 12 वी पास केली. त्यानंतर 2022 मध्ये रामकृष्ण महाविद्यालयातून बीएससीची पदवी घेतली. शिक्षणासाठी तो दररोज 15 किमी सायकलवरून प्रवास करायचा. एसएससी- सीजीएल परीक्षेसाठी स्वतःला झोकून दिले. वेळेचे नियोजन करून अभ्यास करत होता. मेहनतीला अखेर यश येऊन ईडीमध्ये सहायक प्रवर्तन अधिकारी पदावर त्याची निवड झाली.
गावकऱ्यांनी केला जल्लोष
आयुष राजपूतच्या गावात पहिल्यांदाच एका तरुणाची सरकारी नोकरीसाठी निवड झाली. ईडी परीक्षेचा निकाल लागला तेव्हा आयुषचे यश पाहून गावात आनंदाची लाट पसरली. ठिकठिकाणी मिठाई वाटण्यात आली. आज गावातील युवकांसाठी आयुष रोल मॉडेल बनला आहे. आयुषचे यश पाहून गावकरी सांगतात, खेरे नगला गावात सरकारी नोकरीचा आशेचा किरण दिसत आहे. आयुषला पाहून इतर युवकही त्याचे अनुकरण करतील. जर स्वप्न मोठे असेल तर मेहनतीने ते पूर्ण करण्यासाठी ताकद आपल्यात असते हे आयुषकडे पाहून दिसून येते.