PNB bank loan fraud case – घोटाळेबाज मेहूल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

तब्बल 13 हजार 850 कोटी रुपयांचा बँक घोटाळा करून देशाबाहेर पळालेला घोटाळेबाज हिरेव्यापारी गीतांजली जेम्सचा मालक मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. 12 एप्रिल रोजी बेल्जियममध्ये एका रुग्णालयातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. हिंदुस्थानच्या तपास यंत्रणांनी केलेल्या विनंतीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. ‘एएनआय’ने सक्तवसुली संचालनालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

मेहूल चोक्सी हा गेली अनेक वर्ष अँटिग्वामध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वी तो तिथून पसार झाला आणि त्याने बेल्जियममध्ये आश्रय घेतला. आता त्याला तिथे अटक करण्यात आली असून ईडी आणि सीबीआयने त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू केले आहेत.

मेहूल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी ही बेल्जियमची नागरिक आहे. तिच्यासोबत बेल्जियममधील अँटवर्प येथे एफ रेसिडेन्सी कार्ड मिळवून राहत आहे. रेसिडेन्सी कार्ड मिळवण्यासाठी त्याने बेल्जियमच्या प्रशासनाला बनावट कागदपत्रे सादर केल्याची माहिती समोर येत आहे. आता त्याला अटक झाली असून त्याला हिंदुस्थानात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र चोक्सी बेल्जियमच्या न्यायालयामध्ये कायदेशीर डावपेच खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यार्पणाला किती काळ जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.